पिंपरी | तळवडे-त्रिवेणीनगर रस्ता देतोय अपघाताला निमंत्रण

निगडी, (वार्ताहर) – तळवडे -त्रिवेणीनगर रस्ता मागील काही महिन्यांपासून सातत्याने अपघात, दुर्घटना यासाठी चर्चेत राहिला आहे. मागील काही महिन्यापूर्वी रस्ते अपघातात दोन ते तीन व्यक्तींना आपला जीव घमवावा लागला. तर शोभेची दारू बनविणार्या कारखान्याला आग लागून अनेकांचा जीव गेला. येथील अरुंद रस्त्यामुळे मदत वेळेत पोहोचली नाही. परंतु प्रशासन या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथे सातत्याने अपघात घडत आहेत.
तळवडे येथून त्रिवेणीनगरकडे जाणार्या मार्गावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने सकाळी व सायंकाळी तर दुपारच्या वेळी देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे गर्दीतून मार्ग काढताना तसेच रस्त्यातील खड्डे, खडी यामुळे दुचाकींना अपघात घडत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी हुमा बेकरी जवळील रस्त्यावर रस्ते खोदाईचे काम करण्यात आले होते. मात्र, काम झाल्यानंतर येथील खडी उचलण्यात आलेली नाही. त्यामुळे दुचाकी घसरून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अर्धवट काम करणार्या कर्मचार्यांना आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
तळवडे येथील नागरिकांनी येथील रस्त्याच्या समस्यांबाबत महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर तक्रार दाखल केली आहे. परंतु प्रशासकीय राजवटीत नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे. अजून किती नागरिकांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे, असा प्रश्न नागरिक करत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन व वाहतूक विभाग यांनी समन्वय साधून येथील रस्ते अपघात व वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.





