Satara: दिवाळी फराळाची गोडी महागली!
Satara सातारा शहरांमध्ये छोटे-मोठे पूर्ण क्षमतेने सक्रिय असणारे 80 पेक्षा अधिक बचत गट आहेत. या बचत गटांना दिवाळीच्या निमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल महत्त्वाचे असते .मात्र कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे जिल्हा अंतर्गत किंवा देशांतर्गत ऑर्डर मिळवण्यासाठी समाज माध्यमांचा आधार घेतला जात आहे .

Satara: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सातारा शहरासह जिल्ह्यात फराळाच्या तयारीला वेग आला आहे. घराघरांत दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू असतानाच महिला बचतगट आणि घरगुती फराळ विक्रेत्यांकडे चकली, करंजी, अनारसे, शंकरपाळी आणि लाडूंसाठी बुकिंग होऊ लागले आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीची झळ, वाढती महागाई आणि कच्च्या मालाच्या खर्चात झालेली वाढ यामुळे यंदा फराळ तयार करताना महिला बचतगटांची आर्थिक कसरत सुरू आहे. उत्पादन खर्च वाढला असला, तरी ग्राहकांच्या खिशाचा विचार करून दर किती वाढवायचे, असा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
दिवाळीचा फराळ म्हणजे सणाच्या आनंदाचा अविभाज्य भाग. मात्र, यंदा हा आनंद टिकवताना ग्राहक आणि फराळ उत्पादक अशा दोघांनाही खर्चाचे गणित जुळवावे लागत आहे. बेसन, रवा, मैदा, साखर, तेल आणि इतर साहित्याच्या किमती 15 टक्के वाढल्याने फराळ तयार करण्याचा खर्च वाढला आहे. त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या क्षमतेचाही विचार करावा लागत आहे.
दर वाढवायचे किती, ग्राहक टिकवायचे कसे?
महिला बचतगटांसाठी दिवाळीचा फराळ हा उत्पन्नाचा महत्त्वाचा हंगाम असतो. या काळातील ऑर्डरमधून मिळणार्या उत्पन्नावर अनेक महिलांचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, साहित्य महागल्याने उत्पादन खर्च वाढत असताना दरात मोठी वाढ केल्यास ग्राहक कमी होण्याची भीती आहे. दरवाढ टाळल्यास नफ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे खर्च, मेहनत आणि विक्री यांचा मेळ घालत बचतगटांना यंदा फराळ तयार करावा लागत आहे.
सातारा शहरांमध्ये छोटे-मोठे पूर्ण क्षमतेने सक्रिय असणारे 80 पेक्षा अधिक बचत गट आहेत. या बचत गटांना दिवाळीच्या निमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल महत्त्वाचे असते .मात्र कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे जिल्हा अंतर्गत किंवा देशांतर्गत ऑर्डर मिळवण्यासाठी समाज माध्यमांचा आधार घेतला जात आहे .
तयार फराळाला वाढती पसंती
नोकरी, व्यवसाय आणि दैनंदिन धावपळीमुळे अनेक कुटुंबांना घरी सर्व पदार्थ तयार करणे शक्य होत नाही. त्यामुळे घरगुती चवीच्या तयार फराळाला पसंती मिळत आहे. अनारसे बनविणे तुलनेने अवघड असल्याने त्यांची खरेदी केली जाते. चकली, करंजी, शंकरपाळी, चिरोटे आणि लाडू यांनाही मागणी असते. ग्राहक दर्जा, चव आणि स्वच्छतेला प्राधान्य देत असून, एकदा पसंत पडलेल्या विक्रेत्याकडून दरवर्षी फराळ घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
फराळाचे दर (प्रतिकिलो)
चिवडा : 450 ते 650 रुपये
चकली : 600 ते 700 रुपये
शंकरपाळी : 450 ते 550 रुपये
लाडू : 450 ते 700 रुपये
अनारसे व करंजी : 30 ते 45 रुपये प्रति नग
फराळ पॅकेज : 600 ते 1,800 रुपये
दिवाळीच्या तोंडावर ऑर्डर वाढण्याची शक्यता असली, तरी महागाईच्या पार्श्वभूमीवर यंदा विक्रीतून किती उत्पन्न मिळणार, याबाबत बचतगटांना नियोजनपूर्वक पावले टाकावी लागत आहेत. दिवाळीचा गोडवा कायम ठेवताना महिलांना वाढत्या खर्चाशी झुंज द्यावी लागत असून, ग्राहकांचे बजेट आणि स्वतःचा उत्पादन खर्च यांचा समतोल राखण्याचे आव्हान यंदा अधिक तीव्र झाले आहे.





