सर्वेक्षणातून सापडले 12 करोनाबाधित

9 दिवसांत केलेल्या सर्वेक्षणाचा होतोय फायदा
पुणे – शहरात 9 एप्रिलपासून करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महापालिकेकडून या भागात घरोघरी जाऊन पुन्हा सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात महापालिकेने 9 ते 17 एप्रिल या कालावधीत 1 लाख 65 हजार 958 घरांची तपासणी केली असून त्यात 231 करोना संशयित आढळून आले होते, त्यांच्या घशातील द्रवाची तपासणी केली असता सुमारे 12 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्वेक्षणातून करोनाचा प्रसार रोखण्यास महापालिकेस फायदा होत असल्याचे चित्र आहे.
शहरात 9 एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणात नव्याने रूग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने हे सर्व रूग्ण वस्ती भागातील असून दाटलोकवस्तीत ते आढळत आहेत. त्यामुळे या साथीला अटकाव घालण्यात प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने ज्या भागात नवीन रूग्ण आढळून आले आहेत त्या भागात 9 एप्रिलपासून पुन्हा हायरिस्क एरिया म्हणून सर्वेक्षणास सुरुवात केली आहे.
दोन टप्प्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पहिला टप्पा 8 ते 11 एप्रिल हा होता तर, दुसरा टप्पा 13 ते 17 एप्रिल होता. या कालावधीत या भागात पालिकेकडून प्रत्येक घराची तपासणी करण्यात आली. त्यात सुमारे 1 लाख 65 हजार 958 घरांमधील 5 लाख 61 हजार 609 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे 231 जणांना करोना सदृश लक्षणे आढळल्याने पालिकेकडून त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात जवळपास 12 जण करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे या बाधितांकडून या साथीचा संभाव्य होऊ शकणारा प्रसार सर्वेक्षणामुळे महापालिकेस रोखणे शक्य झाले आहे.



