“ठाकरे हे आडनाव फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभतं”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला संजय गायकवाडांचे प्रत्युत्तर

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच मराठी भाषा दिनानिमित्त केलेल्या भाषणातून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा उल्लेख बांडगुळं असा केला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाचा वृक्ष उभा केला आहे. जे गेले ते बांडगुळं होती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना,“आम्ही बांडगुळं नाहीत. आम्ही बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या वटवृक्षाच्या पारंब्या आहोत. हा वटवृक्ष बाळासाहेबांच्या विचाराने मजबुतीने उभा आहे. त्यांना (उद्धव ठाकरेंना) आम्ही बांडगुळं वाटत असू तर आज या बांडगुळांनी त्यांना शक्ती दाखवून दिली आहे. आज ते कुठे आहेत आणि आम्ही कुठे आहोत, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे,” अशी टीका संजय गायकवाड यांनी केली.
संजय गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना,”ठाकरेंच्या नावाबद्दल उद्धव ठाकरे जे काही बोलले आहेत, त्यावर एवढंच सांगू इच्छितो की, बाळासाहेब ठाकरे यांची जी ठाकरी शैली आहे, ती कुणाकडेच नाही. ते एकदा बोलले की बोलले, मग हिंदुत्वाशी तडजोड नाही. काँग्रेसबरोबर जाण्याची माझ्यावर वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन, ही बाळासाहेब ठाकरेंची भाषा होती. त्यामुळे ठाकरे हे आडनाव फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभतं, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त, शिवसेनेची वीण घट्ट आहे. आपली मूळं रुजली आहेत. त्यामुळे तुम्ही वरचे शेंडे-बुडके उडवा, काहीही फरक पडणार नाही. कुणाला वाटलं असेल की, ही फुलं तोडली म्हणजे झाड मेलं असेल, पण असं अजिबात नाही. काही वेळा बांडगुळं छाटली जातात. कारण ती बांडगुळं छाटावीच लागतात. ती आपोआप गळून पडत असतील तर आम्हाला आनंद आहे, असे म्हटले होते.





