“कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही”; प्रकाश आंबेडकरांचे महत्वाचे विधान

मुंबई : राज्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात सुरु झाला तो सत्तासंघर्ष. राज्यात सध्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे संयुक्त सरकार आहे. पण शिंदे गटातील अजूनही आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. याच मुद्द्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत घडामोडी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील सत्तासंघर्षावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला, तरी कुणाला अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही. त्यावेळीचे जे उप सभापती यांच्या निर्णयाला न्यायालयाने जी स्थगिती दिली होती.
ती स्थगिती कदाचित उठवली जाईल, अशी परिस्थिती आहे. हे प्रकरण राज्यपाल आणि कार्यकारिणी मंडळ यांच्यातील आहे. त्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.”





