#IPL2022 #DCvSRH | वॉर्नर व पॉवेलचा तडाखा; दिल्लीचे हैदराबादसमोर 208 धावांचे लक्ष्य

मुंबई – सलामीवीर डेव्हीड वॉर्नर व रॉमन पॉवेल यांनी केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल स्पर्धेतील गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 3 गडी गमावून 207 धावांचा डोंगर उभारला आहे.
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत दिल्लीला पहिल्यांदा फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीत सलामीला बढती देण्यात आलेला दिल्लीचा मनदीप सिंह पहिल्याच षटकांत बाद झाला. त्यानंतर आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात असलेला मिशेल मार्शनेही निराशा केली. यावेळी दिल्लीची धावसंख्या 2 बाद 37 अशी होती.
त्याचवेळी वॉर्नरने कर्णधार ऋषभ पंतला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंत चांगला खेळत असताना नेहमीच्याच पद्धतीने अनावश्यक आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 16 चेंडूत 1 चौकार व 3 षटकारांसह 26 धावा केल्या. त्यानंतर पॉवेलने वॉर्नरला सुरेख साथ देत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.
दरम्यान वॉर्नरने आपले अर्धशतक पूर्ण करत शतकाकडे कुच केली मात्र, पॉवेलने निर्णायक क्षणी केलेली वादळी फलंदाजी पाहण्याचीच त्याच्यावर वेळ आली. शतकाच्या जवळ पोहोचुनही त्याला 92 धावांवर नाबाद राहावे लागले. त्याने आपल्या खेळीत 58 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 3 षटकार फटकावले. मात्र, आक्रमक फलंदाजीची ही कसर पॉवेलने भरून काढताना वादळी अर्धशतक साकारले. त्याने नाबाद 67 धावांची खेळी करताना हैदराबादच्या गोलंदाजांची पिसे काढली.
या खेळीत त्याने 35 चेंडूत 3 चौकार व तब्बल 6 षटकार फटकावले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 66 चेंडूत 122 धावांची भागीदारी केली. त्यांच्या याच खेळीमुळे दिल्लीने 20 षटकांत 3 बाद 207 असा धावांचा डोंगर उभा केला. हैदराबादकडून भूवनेश्वर कुमार, श्रेयस गोपाल व सीन अबॉट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 3 बाद 207 धावा. (ऋषभ पंत 26, मिशेल मार्श 10, डेव्हीड वॉर्नर नाबाद 92, रॉमन पॉवेल नाबाद 67, भूवनेश्वर कुमार 1-25, श्रेयस गोपाल 1-34, सीन अबॉट 1-47).





