गुजरातमधील निवासी डॉक्टरांच्या संपाचा पेच सहाव्या दिवशीही कायम

अहमदाबाद – गुजरातमधील निवासी डॉक्टरांच्या संपाचा पेच सोमवारी सहाव्या दिवशीही कायम राहिला. आता निषेधाचे पाऊल म्हणून त्यांनी कोविड योद्धा प्रमाणपत्रं परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
सेवाकाळाच्या निकषांना विरोध दर्शवण्यासाठी आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुजरातमधील सुमारे 2 हजार निवासी डॉक्टरांनी 4 ऑगस्टपासून संप पुकारला आहे. त्या संपाबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.
काही निवासी डॉक्टरांना वसतिगृह खाली करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या. आता त्यांनी वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याचा आरोप केला आहे. आम्ही नुकतीच काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली.
त्यावेळी करोना संकटकाळात केलेल्या कामाचा पुरावा आमच्याकडे मागण्यात आला. सरकारकडून देण्यात आलेली कोविड योद्धा प्रमाणपत्रं आम्ही दिवसरात्र केलेल्या कार्याचे पुरावेच आहेत. मात्र, आमचा अवमान केला जात आहे. त्यामुळे ती प्रमाणपत्रं परत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे संपात सहभागी झालेल्या निवासी डॉक्टरांनी जाहीर केले.





