पुणे | थेट मांडणी हीच माहितीपटांची ताकद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोणताही विषय थेट आणि नेमक्या पद्धतीने मांडता येणे, ही लघुपट- माहितीपटांची खरी ताकद आहे. ते कमी खर्चात तयार होतात आणि प्रभावीपणे आशय पोहोचवतात, असे मत प्रसिद्ध चित्रपट निर्माते वीरेंद्र वळसंगकर यांनी व्यक्त केले.
आरोग्यविषयक लघुपट व माहितीपटांच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुण्यातील पी. एम. शहा फाउंडेशनतर्फे आरोग्य चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. संचालक अॅड. चेतन गांधी या वेळी उपस्थित होते. एकूण ४० लघुपट, माहितीपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आले.
महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागात कॅप्सूल या लघुपटाने आणि मिशन इम्पॉसिबल या माहितीपटाने प्रथम क्रमांक पटकावले. विजेत्या चमूला वळसंगकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
पूर्ण लांबीच्या चित्रपटासाठी खूप गुंतवणूक करावी लागते. यासाठीची व्यावसायिक आणि व्यावहारिक गणिते निराळी असतात. या सर्व प्रक्रियेत अनेकदा जे सांगायचे आहे, त्याचा आत्मा हरवून जातो आणि विकला जाईल असा माल टाकावा लागतो. माहितीपटात तर वास्तव दर्शनच मांडलेले असते. ते अधिक परिणामकारक आणि प्रेरणा देणारे असते, असे वळसंगकर म्हणाले.
जल, जंगल, जमीनविषयक अधिकार मिळवणारे देशातील पहिले गाव मी लघुपटातून मांडले, तेव्हा मी हा अनुभव घेतला. लघुपट, माहितीपटात प्रयोगशीलतेला अधिक वाव मिळतो, असेही त्यांनी नमूद केले.





