Darya Bhavani : मोठ्या पडद्यावर उलगडणार स्वराज्याच्या सागरी सामर्थ्याची कहाणी; दिग्पाल लांजेकरांच्या ‘दर्याभवानी’ची घोषणा
Darya Bhavani : या चित्रपटाचा एक छोटा टीझर देखील रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट १५ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Darya Bhavani : लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित ‘श्री शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सातवा चित्रपट ‘दर्याभवानी’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून, त्यानंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाचा एक छोटा टीझर देखील रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट १५ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.
पोस्टर लाँच सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांसह मराठा आरमाराचे सरसेनापती दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल विशेष उपस्थित होते. ‘ज्याच्याकडे अश्वबल त्याची पृथ्वी आणि ज्याच्याकडे समर्थ आरमार त्याचा समुद्र’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवत, स्वराज्याच्या सागरी सामर्थ्याची, आरमार उभारणीची, जलदुर्गांच्या रणनीतीची आणि समुद्रावरील मराठी वर्चस्वाची भव्य कथा प्रथमच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.
यावेळी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले की, शिवरायांचा इतिहास केवळ गड-किल्ल्यांपुरता मर्यादित नसून समुद्रावर उभ्या राहिलेल्या स्वराज्याच्या सामर्थ्याचाही आहे. ‘दर्याभवानी’च्या माध्यमातून शिवरायांची सागरी दूरदृष्टी, आरमार निर्मिती आणि जलदुर्गांचे ऐतिहासिक महत्त्व प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटात अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, ऋषी सक्सेना, आस्ताद काळे, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, नितीन वाघ आणि सचिन देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले असून, नितीन वाघ यांनी सहलेखक म्हणून काम पाहिले आहे. विजय खडके यांनी छायांकन, तर केदार दिवेकर आणि अवधूत गांधी यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. गीतलेखनही दिग्पाल लांजेकर यांनीच केले आहे.
‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ आणि ‘रणपति शिवराय’ या गाजलेल्या चित्रपटांनंतर ‘श्री शिवराज अष्टक’ मालिकेतील सातवा भाग म्हणून ‘दर्याभवानी’कडे प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
हेही वाचा : Pune News : ‘आईला वाचवू शकलो नाही’; या वेदनेतून लेकाचं टोकाचं पाऊल; पुण्यात शोककळा


