सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात वाढ

मुंबई – देशातील आणि परदेशातील परिस्थिती अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल होत असल्यामुळे शेअर बाजारात दिवाळीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारातील निर्देशांकात वाढ झाली. आता मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सला 42 हजाराचे वेध लागले आहेत. शुक्रवारी सेन्सेक्स 1.34 टक्क्यांनी म्हणजे 552 अंकांनी वाढून 41,893 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 143 अंकांनी वाढून 12,263 अंकावर बंद झाला.
आजच्या तेजीचे नेतृत्व रिलायन्स कंपनीने केले. या कंपनीत नऊ हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाल्यामुळे या कंपनीचा शेअर तीन टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर बजाज फिन्सर्व, इंडसइंड बॅंक, एचडीएफसी, कोटक बॅंकेचे शेअर आघाडीवर होते. भारतातील कंपन्यांची उत्पादकता वाढणार असल्याचे पाहून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करीत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी या गुंतवणूकदारांनी 5,368 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्यामुळे स्थानिक गुंतवणूकदारही खरेदी करीत असल्याचे वातावरण शेअर बाजारात आहे.
आजच्या व्यवहाराबाबत अँजेल ब्रोकिंगचे विश्लेषक सुमित चव्हाण यांनी सांगितले की भारतातील अर्थव्यवस्था सुधारत असल्यामुळे आणि अमेरिकेचे व्याजदर शुन्य टक्क्यांच्या जवळपास राहणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे शेअर बाजारात खरेदीचे वातावरण आहे.
मात्र तरीही अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे औपचारीक निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदार सावध राहतील. निकालानंतर परिस्थिती अशीच पोषक राहिली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 12,430 ते 12,700 अंकापर्यंत मजल मारू शकतो. मात्र दरम्यानच्या काळात परिस्थिती बिघडली तर निफ्टीला 11,900 वर मजबूत तांत्रिक आधार आहे.




