‘नौदलाच्या मदतीने पुन्हा पुतळा उभारला जाईल; विरोधकांनी राजकारण करू नये’ – देवेंद्र फडणवीस

नागपूर – मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे नौदलाच्या मदतीने पुन्हा त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारला जाईल. त्यामुळे विरोधकांनी आता राजकारण करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
नागपूर विमानतळावर बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मालवणातील राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत भाष्य करत विरोधकांना सूचना आणि विनंती केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मालवणच्या घटनेवर कुणीच राजकारण करू नये, ही माझी विनंती आहे. महाराजांचा पुतळा कोसळणे ही दुःखद घटना आहे. अशा घटनांची योग्य चौकशी करून कोण दोषी आहेत, हे समोर आले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याठिकाणी पुन्हा भव्य असा पुतळा उभारला गेला पाहिजे.
आम्ही या तीनही गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले आहे. नौदलाने ही बाब गांभीर्याने घेतली असून चौकशी समिती तयार केली आहे. या समितीने पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली आहे. नौदल यावर उचित कारवाई करेल. जे दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाई करेल, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच, महाराजांचा पुतळा कोसळण्यासाठी नेमकी कोणती घटना जबाबदार होती. त्यात काय चुका राहिल्या, या संदर्भातला अहवाल नौदल देणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेही पोलिसांत एफआयआर दाखल केलेला आहे. नौदलाच्या अहवालानंतर पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाईल.
तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे नौदलाच्या मदतीने पुन्हा त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारला जाईल. ही घटना घडल्यानंतर जे जे करणे आवश्यक आहे, ते केले जात आहे.
तरीही विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. हे अत्यंत चुकीचे असून विरोधकांनी खालच्या पातळीचे राजकारण करू नये, असे आवाहन फडणवीसांकडून करण्यात आले आहे.





