Satara | संभाजी महाराजांचा पुतळा ऊर्जास्थान बनेल

कोळकी, (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते होत आहे ही बाब माझ्यासाठी निश्चितच अभिमानाची असून हा पूर्णाकृती पुतळा सर्वांसाठीच ऊर्जास्थान बनणार आहे, असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजीराजे यांचे आजोळ असलेल्या फलटणमध्ये छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व आ. रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात करण्यात आले. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
ते म्हणाले, जगायचं कसं, स्वराज्य स्थापन करून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे, राजा म्हणून कसं राहायला पाहिजे, हे आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. देव, देश, धर्म यासाठी कसं लढताना विविध संकटांना न डगमगता, न मोडता, न झुकता आपण उभं राहिलं पाहिजे हेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपणाला शिकवलं आहे.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचा आदर आजही आबाधीत असून छत्रपती सईबाई महाराज व छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांना फलटणच्या इतिहासात सर्वांनी कायमस्वरूपी स्थान दिले आहे. हा कार्यक्रम राजकीय नसून भोसले व नाईक निंबाळकर या दोन घराण्यांचे ऐतिहासिक संबंध दृढ करणारा आहे.
राजगडाच्या पायथ्यापाशी छत्रपती सईबाई महाराज यांच्या स्मारकाचे काम अत्यंत वेगाने सुरू असून मुरूम येथे सुभेदार मल्हार होळकर यांच्या स्मारकाचेही काम लवकरच साकारले जाणार आहे.
यावेळी आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, जिलहा परिषदचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, विश्वजितराजे नाईक निंबाळकर, भवानीसिंह घोरपडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तुळापूर येथून आणलेल्या ज्योतीचे स्वागत करण्यात आले. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.
फलटण- पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, विश्वजीतराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर


