Pimpri : कर्जत नगरपरिषदेने उभारलेल्या न्यायदेवतेच्या पुतळ्याची दुरावस्था

कर्जत : कर्जत नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे कोपरा गार्डन ह्या संकल्पनेखाली शहरात बांधण्यात आलेल्या जवळपास सर्वच स्मारकांची दुरावस्था झाली आहे. त्यातही कर्जत दिवाणी न्यायालयाच्या शेजारी नगरपरिषद प्रशासनाकडुन साकारण्यात आलेल्या न्यायदेवतेच्या स्मारकाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. नगरपरिषदेला याबाबत अनेकदा कळवूनही पालिकेकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. यामुळे न्यायदेवतेच्या पुतळ्याची दुरावस्था पाहून नागरिक प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत.
काही दिवसापूर्वी न्यायदेवतेच्या स्मारकावर झाडांच्या फांद्या लोंबकळत होत्या. तसेच न्यायदेवतेच्या स्मारकाच्या एका हातातील तराजु गायब झाला होता. स्मारकाला असलेले बॅरिकेटस देखील गायब झाले असून विद्युत दिवे बंद पडले आहेत. याबाबत माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर कर्जत नगरपरिषद प्रशासनाकडुन केवळ स्मारकावर लोंबकळत असलेल्या झाडांच्या फांद्या छाटुन टाकण्यात आल्या. परंतु स्मारकाच्या हातातील तुटलेला तराजु काही बसविला नाही. नगरपरिषदेचा हा कामचुकारपणा पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कर्जत नगरपरिषदेने जे कोपरा गार्डन बनविले आहेत, त्याची योग्य निगा राखली पाहिजे. न्यायदेवतेच्या हातातील तराजू गायब होणे हे गंभीर बाब असून पुतळ्याची विटंबना आहे, असे आम्हाला वाटते. नगर परिषद प्रशासनाने याबाबत तातडीने पाऊले उचलून स्मारकाची डागडुजी करायला हवी. तसेच शहरातील सर्वच स्मारकांची योग्य ती निगा राखून ते सदैव सुस्थितीत राहतील, याची काळजी घेतली पाहिजे.
– ॲड. कैलास मोरे, कर्जत
कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव गारवे यांनी संबंधित विभागातील कामचुकार अधिकार्यांवर विसंबुन न राहता जातीने यात लक्ष टाकावे. न्यायदेवतेच्या स्मारकाची विटंबना थांबवुन स्मारकाचे गतवैभव प्राप्त करून द्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.





