पुण्यातील नाट्यगृहांची अवस्था बिकट

पुणे – महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यातील नाट्यगृहांची अवस्था सध्या बिकट झाली आहे. कुठे विंग तुटल्या आहेत; तर कुठे खुर्च्या मोडल्या आहेत, काही नाट्यगृहांमधील पंखे मोडकळीस आले आहेत. याचबरोबरीने नाट्यगृहांच्या स्वच्छता गृहांची अवस्था न विचारलेलीच बरी. त्यामुळे नाट्यगृह म्हणायचे की अडगळीची खोली, असा प्रश्न रसिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पर्वती येथे नव्याने उभारलेल्या साहित्यसम्राट विजय तेंडूलकर नाट्यगृहाची अवस्था बिकट होत आहे. खुर्च्या मोडून दुसरीकडे फेकल्या आहेत. तर नाट्यगृहातील एका खोलीमध्ये शेजारीच असणाऱ्या शाळेतील साहित्य आणि कचरा पडला असल्याने अडगळ निर्माण झाली आहे. यासह नाट्यगृहांतील जिन्याखाली लोखंडी बार पडले आहेत, यामुळे नागरिकांना दुखापत होण्याची आहे. ही नाट्यगृहाच्या बाहेरची अवस्था आहे. मात्र नाट्यगृहातील रंगमंच आणि “रसिक मायबापा’साठी असणारी आसन व्यवस्थाच मोडकळीस आली आहे. नाट्यगृहातील व्हरांड्यात पडलेल्या रेलिंग बारमुळे अपघातांना निमंत्रण देण्यात येत आहे. या दुर्लक्षित बारमुळे नागरिक पडण्याची अथवा अनावधानाने धडकून अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
वायरमुळे दुर्घटनेला आमंत्रण
नाट्यगृहातील रंगमंचाजवळ वायरचे जाळे पडले आहे. यामुळे आगीची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध ठिकाणी वारंवार शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना घडत असताना, महापालिका आणि नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.














