शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट पडलेली असताना, भारतीय जनता पक्षाची स्थानिक पातळीवरील कमकुवत झालेली संघटनात्मक स्थिती, हे दोन प्रमुख घटक आगामी नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये अनिश्चितता निर्माण करत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना, त्यांची लढत भाजप आणि शिवसेनेसोबत होऊन स्थानिक संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले होते. पक्ष फुटीमुळे आता दिलीप वळसे-पाटील (अजित पवार गट) आणि अशोक पवार (शरद पवार गट) यांची ताकद विभागली गेली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे दोन गट पडल्यामुळे राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार आणि स्थानिक कार्यकर्ते दुभागले गेले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर कटके यांनी अशोक पवार यांचा पराभव केल्याने कटके गटाचे मनोबल वाढले असले, तरी ग्रामीण भागातील मोठा वर्ग अजूनही पवार या नावावर निष्ठा ठेवून असल्याने शरद पवार यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे. यामुळे दोन्ही गटांना स्थानिक पातळीवर स्वतंत्र उमेदवार उभे करावे लागणार असून, मतांचे विभाजन निश्चित आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षापेक्षा वैयक्तिक संबंध आणि उमेदवाराची ताकद जास्त महत्त्वाची असल्याने, दोन्ही गटांतील मुख्य नेत्यांची व्यक्तिगत ताकद हीच खरी कसोटी ठरणार आहे. भाजपची तकलादू अवस्था शिरूर तालुक्यात भाजपची ताकद नेहमीच मर्यादित राहिली आहे. दिवंगत आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पश्चात पक्षाला तगडा आणि सर्वमान्य चेहरा उभा करता आलेला नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपने अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याने स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्त्यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. पक्ष संघटनेत उत्साह नसणे आणि सक्रिय नेतृत्वाची कमतरता यामुळे भाजप बाजूला जात असल्याने शिरूर तालुक्यात भाजपची तकलादू अवस्था झाली आहे. संभाव्य राजकीय समीकरणे… शिरूर तालुक्यात आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीतील दोन्ही गटांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता अधिक आहे. राष्ट्रवादीच्या फुटीमुळे मतांचे होणारे विभाजन भाजपसाठी सुप्त संधी निर्माण करू शकते. मात्र, त्यासाठी भाजपने अत्यंत आक्रमक आणि ध्रुवीकरणाचे राजकारण करण्याची गरज आहे. स्थानिक राजकारणात पक्षापेक्षा ‘माणूस’ महत्त्वाचा ठरत असल्याने, दोन्ही गटांतील नेत्यांची व्यक्तिगत ताकद आणि गट टिकवून ठेवण्याची क्षमता यावरच शिरूरच्या स्थानिक राजकारणाचे भवितव्य ठरणार आहे.