भोर तालुक्यात असणाऱ्या नीरानदीचे उगमस्थान दुर्लक्षित

शिरगाव – भोर तालुक्याच्या पच्छिमेस असलेले हिरडस मावळ म्हणजे बावन्न गावचे खोरे, डोंगराळ व अत्यंत पर्जन्यमान असलेला भाग होय. या हिरडस मावळातील भोर पासून ४०/४५ किमी अंतरावर असलेल्या शिरगाव येथे असलेल्या नीरा नदीचे उगम स्थान म्हणजेच निरबावी होय.
शिरगाव गावातून उजव्या बाजूला असलेल्या पाऊल वाटेने काही अंतर गेल्यावर उगम स्थान असलेल्या ठिकाणी एक दगडांनी बांधलेले सुंदर कुंड आहे. त्या कुंडात उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत.
कुंडाच्या एका बाजूस गोमुख असून त्यातून पाण्याचा प्रवाह अव्याहत वाहत आहे. हेच नीरा नदीच उगमस्थान असून आजूबाजूला गर्द झाडी, निरव शांतता तसेच दुसऱ्या बाजूला छत नसलेला दगडी चौथऱ्यावर शंभू महादेवाची पिंड पाहायला मिळते.
निरबावीत उतरल्यावर उजव्या बाजूला दगडावर बांधकाम सुरुवात केल्याचे वर्ष व शिलालेख कोरलेले असून त्या दगडाची झीज झाल्याचे दिसून येत आहे. येथे असलेले कुंड हे प्राचीन कालीन असून या ठिकाणची डागडुजी आज तागायत केली नसल्याचे बोलले जात आहे. या नीरा नदी उगम स्थानाचे सुशोभीकरण करून हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थ व भागातील नागरिकांकडून बोलले जात आहे.
“शिरगाव येथील नीरा नदी उगम स्थानास भेट दिली असता तेथील निरबावी येथे ऐतिहासिक प्राचीन कालीन कुंड आहे. गोमुख जमिनीला टेकले असून ते मातीत गाडण्याची शक्यता असून त्यातून वाहणाऱ्या प्रवाहास ओहोळ तयार करणे गरजेचे आहे. तसेच तेथील असणाऱ्या मूर्ती उघड्यावर असल्याने झीज होत असल्याने तेथे एखादे शेड बांधण्याची आवश्यकता आहे. एकंदरीत येथे संवर्धन होणे गरजेचे आहे.”
– समीर घोडेकर (सामाजिक कार्यकर्ते भोर)
या ठिकाणची डागडुजी गेली बरेच वर्ष केली नसल्याने बांधकाम व दगड ढासळू लागले आहेत, गाळ साठलेला आहे तसेच गोमुख चिखलात गाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा या कुंडाचे (नीरबावी) संवर्धन व्हावे अशी मागणी उपसरपंच निलेश पोळ, पोलीस पाटील भाऊसाहेब उंब्राटकर, दत्ता पोळ सह ग्रामस्थ यांचे वतीने होत आहे. यावेळी समिर घोडेकर, मंगेश आवाळे, बापु कुडले, प्रदीप दिघे, विक्रम मालुसरे, नाना कांबळे, स्वप्निल घोडेकर यांनी या ठिकाणी भेट दिली.
“नीरा नदीचा पवित्र उगम स्थान आमच्या शिरगावात असल्याने अभिमान आहे. सदर उगम स्थानाकडे प्रशासनाने लक्ष देऊन पडझडीचे दुरुस्ती करून पर्यटनास चालना द्यावी. वरंधा घाट,मोहनगड ,नीरा -देवघर परिसर इत्यादी पाहण्यास पर्यटक नेहमी येत असतात. या उगमस्थानाचे संवर्धन केल्याने पर्यटक येऊन पर्यटन व्यवसाय वाढू शकतो.”
– भाऊसो उंब्राटकर, निलेश पोळ (शिरगाव)
शिरगाव येथे उगम होणारी ही नीरा नदी पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख नदी असून या नदीवर नीरा देवघर व वीर अशी धरणे बांधण्यात आली आहेत. ही नीरा नदी भोर तालुक्यात उगम होऊन पुढे पुणे जिल्ह्यातून सातारा, सोलापूर जिल्ह्यातून वाहत जाते. चंद्रभागेस ही नदी मिळते. भीमा नदीची उपनदी असलेली नीरा नदीच्या वेळवंडी, गुंजवणी, पूर्ण गंगा, बाणगंगा, खेमवती, कऱ्हा या उपनद्या आहेत.








