पुणे जिल्हा | बारामतीच्या गडावर तुतारीचा आवाज

पुणे, (जिल्हा प्रतिनिधी)– संपूर्ण जगातील प्रसारमाध्यमाने दखल घेतलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील अटीतटीच्या लढतीत बारामतीच्या गडावर शरद पवार यांच्या तुतारीचा आवाज घुमली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठतेची असलेल्या लढतीत शरद पवार यांनी महायुतीला धोबीपछाड दिली. यात भाजपने टाकलेले डावपेच राजकीय पटलावर निकामी झाले आहेत. त्यामुळे बारामतीवर सबकुछ शरद पवार, हे निकालातून अधोरेखित झाले आहे.
बारामती लोकसभा निवडणूक ही गेल्या दहा वर्षांत नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यापूर्वी एकतर्फी होणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २०१४ पासून चर्चेत आली. शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ कायम पाठिशी राहिला आहे. हे १९६७ पासून स्पष्ट झाले आहे.
२०१४ मध्ये मोदी लाटेत बारामतीच्या बालेकिल्ल्याचे बुरूज डळमळीत होत असताना शरद पवार यांनी बेरजेचे राजकारण करीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप यांना सोबत घेत भाजपाचे डावपेच फेल केले. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी महादेव जानकर यांचा ५९ हजार मतांनी पराभव केला. २०१४ नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी तळागाळातील लोकांशी संपर्क साधत विकासकामे मार्गी लावली. गेल्या दहा वर्षांपासून खासदार सुळे यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरली.
२०१९ मध्ये भाजपाचा यशाचा आलेख उंचावला होता. त्यावेळी भाजपाकडून बारामतीमधून आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली. त्यावेळी कांचन कुल यांनी खासदार सुळे यांना कडवी लढती दिली होती. खासदार सुळे यांनी कुल यांचा दीड लाखांच्या फरकाने पराभव केला.
तीन टर्म वादळाविरोधात झुंज
बारामती मतदारसंघात तीन टर्म वादळच घोंगावले आहे. २०१४ मध्ये मोदी लाट, २०१९ मध्ये मोदींचा करिष्मा, तसेच मतदारसंघातील भाजपाची वाढलेली ताकद ही कारणे खासदार सुळे यांच्यासाठी झुंजविणारी होती. त्यानंतर गेल्या अडीच वर्षांत राज्यातील घडामोडीनंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला.
अजित पवार यांनी काकांची साथ सोडल्याने पवार कुटुंबीयात उभी फूट पडली. त्यामुळे खासदार सुळे यांच्यासाठी ही निवडणूक खडतर होती. अजित पवार यांची ताकद कमी झाल्याने शरद पवार, खासदार सुळे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची होती. शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती असल्याने मतदारांनी तीनवेळा मोठी साथ दिली.
बारामती, इंदापूर, दौंडने तारले
शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार आहे. यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. प्रामुख्याने बारामती, इंदापूर, दौंडने खासदार सुळे यांना तारले. त्याचबरोबर महाविकास आघाडीचा धर्म म्हणून भोर, वेल्हा, मुळशी मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी निकराची लढत दिली. त्यांच्या तालुक्यातून सुळे यांच्या प्रचाराची बाजू सांभाळली. त्यामुळे सुळे यांच्या मताधिक्यात वाढ झाली.
शरद पवारांनी वजाबाकी बेरजेत केली
बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून महायुतीच्या गोटात सहभागी झाले. त्याचा फटका हा खासदार सुळे यांना बसणार होता. अजित पवार यांच्याबरोबर सरासरी दीड लाखांची मतपेढी ही गेली होती. त्यामुळे गतवेळी सुळे या दीड लाखांनी विजयी झाल्या होत्या. मात्र, यावेळी हा धोका ओळखून शरद पवारांनी बेरजेचे राजकारण केले. त्यात त्यांना कमालीचे यश आले.
चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य जिव्हारी
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येत शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने शरद पवार समर्थक, निष्ठावंत कमालीचे नाराज झाले. हा घाव जिव्हारी लागल्याने चंद्रकांत पाटील हे प्रचारापासून अलिप्त राहिले. पुण्यातील सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. हा हल्ला राष्ट्रवादी समर्थकांना दुखावणारा ठरला.
सहानुभूतीची लाट, घटक पक्षांची साथ
बारामती लोकसभेची निवडणूक पहिल्यापासून अटीतटीची झाली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांना मतदारसंघात प्रचंड सहानुभूती मिळाली. त्याचे मतांत रूपांतर झाले. त्यानंतर घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसने तोलामोलाची साथ दिली. तसेच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे सुळे यांच्यासाठी हे घटक पक्ष तारणारे ठरले.





