Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ
Kolhapur : परंपरेनुसार पालखीत विराजमान गणरायाचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

कोल्हापूर : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळत असतानाच कोल्हापुरातही सार्वजनिक गणेश विसर्जन सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली आहे. मानाचा प्रथम तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणरायाची मिरवणूक मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली असून, बाप्पाला निरोप देण्यासाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.
परंपरेनुसार पालखीत विराजमान गणरायाचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. तुकाराम माळी तालीम मंडळाला कोल्हापुरातील गणेशोत्सवाची जुनी आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. पूर्वी या मिरवणुकीत प्रत्यक्ष वाघ आणि अस्वल सहभागी करण्याची परंपरा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मंडळाच्या मिरवणुकीला शहराच्या गणेशोत्सवात विशेष महत्त्व आहे.
यंदाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेतील महिला, विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ आणि शिस्तबद्ध कार्यकर्ते हे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. मिरवणुकीच्या सुरुवातीलाच डी. वाय. पाटील ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीपर पोस्टर्स घेत डीजे आणि डॉल्बीला विरोध दर्शवला. या माध्यमातून पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देण्यात आला.
तुकाराम माळी तालीम मंडळाची मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतरच कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते, अशी परंपरा आहे. यंदाही ही परंपरा कायम राहिली असून, ढोल-ताशांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संपूर्ण शहर भक्तिमय झाले आहे.





