Ahilyanagar Rain : अहिल्यानगर जिल्ह्यात आभाळ फाटलं ! जामखेड रोडवरील कडी नदीला पूर, नागरिकांना हेलिकॉप्टरने काढले बाहेर

Ahilyanagar Rain : राज्यात सर्वदूर पावसाने हाहाकार माजवला असून अनेक जिल्ह्यात पूर परस्थिती निर्माण झाली आहे. अहिल्यानगर शहरासह काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे.
जामखेड रोडवर कडा (ता. आष्टी ) येथील कडी नदीला पूर आला आहे. येथील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जामखेड रोडवर सारोळा बद्दी, धानोरा आणि कडा अशा तीन ठिकाणी रस्ता बंद झाला आहे. तसेच जामखेड रोडवर सारोळा बद्धी (ता. नगर) येथे पुलाचे काम सुरू असताना पावसामुळे पूल वाहून गेला आहे.
तर दुसरीकडे कडा येथे नदी पात्रात साप्ते कुटुंबातील अकरा जण अडकले होते. तसेच शेरी खुर्द येथील काही जण पुरात अडकले होते. अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून सुरक्षित स्थळे हलवण्यात आले आहे.
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील ढगफुटीसदृश्य पाऊस
जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं असून जनावरे, कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. करंजी गावातील अमराई नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर आला आहे.


