गुजरातमधील करोनास्थिती आणखी चिंताजनक

एकाच दिवसात 49 बाधितांचा मृत्यू
अहमदाबाद : गुजरातमध्ये करोना फैलावाची स्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. त्या राज्यात मंगळवारी बाधित आणि बळींच्या संख्येचा उच्चांक नोंदला गेला. गुजरातमध्ये दिवसभरात नवे 441 करोनाबाधित आढळले. त्यामुळे त्या राज्यातील बाधितांच्या संख्येने 6 हजारांचा टप्पा ओलांडला. गुजरातमध्ये करोनाने एकाच दिवसात 49 बाधितांचा बळी घेतला. त्यामुळे त्या राज्यातील मृतांचा आकडा 368 इतका झाला आहे. गुजरातमधील करोना उद्रेकाचे केंद्र अहमदाबाद जिल्हा ठरले आहे.
त्या जिल्ह्यानेही एकाच दिवसातील बळींचा नवा विक्रम नोंदवला. त्या जिल्ह्यात आणखी 39 रूग्ण दगावले. अहमदाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 273 रूग्ण दगावले आहेत. त्या जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4 हजार 500 च्या घरात आहे. अहमदाबादपाठोपाठ गुजरातमधील सुरत आणि वडोदरा या जिल्ह्यांत करोनाबाधितांची संख्या मोठी आहे.
देशातील सर्वांधिक बाधित आणि बळी महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल गुजरातचा क्रमांक लागला आहे. त्या राज्यातील 1 हजार 381 रूग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. गुजरातमधील करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वच यंत्रणा सक्रिय आहेत. त्या राज्यातील चाचण्यांचा वेगही आता वाढला आहे.





