राजकारणात शो केला की वाया गेला – आमदार भरणे

रेडा – इंदापूर तालुक्यातील जनता अत्यंत हुशार असून जर कोणत्याही राज्यकर्त्यांनी राजकारणात “शो’ केला तर तो राजकारणातून हद्दपार होतो. त्यामुळे “शो केला की वाया गेला’, असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सराफवाडी (ता. इंदापूर) गावात आमदार दत्तात्रय भरणे यांनी भेट दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, युवक नेते किरण बोरा, संचालक सचिन देवकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष संदीप माने यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आमदार भरणे म्हणाले की, राज्यात आता विधानसभेचा हंगामा सुरू झाला आहे, त्यामुळे इंदापूर तालुक्यात झोपलेली राजकीय मंडळी अचानक जागे होतील अन् जातीपातीचे राजकारण लोकांमध्ये पेरण्याचे काम करतील; मात्र खऱ्या माणसाला जनतेचा विकास करणाऱ्या चांगल्या व्यक्तींना तालुक्यातील जनता कधीही विसरत नसते. त्यामुळे अचानक झोपेतून उठलेल्या राजकीय नेत्याला जनता जागा दाखवेल, असा टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता आमदार भरणे यांनी लगावला.
इंदापूर तालुक्यातील 22 गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात जिवाचे रान करेल, अशी ग्वाही आमदार भरणे यांनी दिली.





