पुणे | ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राचा सावळागोंधळ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र हे विहित नमुन्यात आणि मराठीत नसल्यावरून अभियांत्रिकीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहे.
याउलट काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रमाणपत्र इंग्रजीत आणि केंद्र सरकारच्या मसुद्यात असल्याचे कारण देत प्रवेश प्रवेश नाकारले आहेत. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाकडून दोन प्रकारचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र शैक्षणिक आणि नोकरीच्या दृष्टीने देण्यात येते.
त्यामध्ये एक प्रमाणपत्र हे राज्य सरकारने दिलेल्या नमुन्यानुसार, तर दुसरे केंद्र सरकारच्या नमुन्यामध्ये देण्यात येत होते.
दोन्ही प्रकारची प्रमाणपत्रे काढण्यासाठी कागदपत्रे एकसारखीच द्यावी लागतात. विद्यार्थी हे प्रमाणपत्र केंद्र किंवा राज्याच्या गरजेप्रमाणे शैक्षणिक किंवा नोकरीच्या कामासाठी वापरत होते.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयांमधून केंद्र सरकारच्या नमुन्यानुसार इंग्रजी भाषेतील प्रमाणपत्र देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांकडून त्याचा वापर शैक्षणिक कामकाजासाठी होत आहे.
दरम्यान, व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविणाऱ्या राज्य सीईटी सेलने माहिती पुस्तिकेत प्रसिद्ध केलेल्या नमुन्यात, तसेच मराठीत नसल्याचा कारणावरून प्रवेश प्रवेश नाकारले आहेत.
विहित नमुन्यात आणि मराठी भाषेत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी मिळालेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग, एमबीए, एमसीएसारख्या अभ्यासक्रमांचा प्रवेश रद्द झाला आहे.
प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तथापि, अभियांत्रिकीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांची मुदत संपली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या संपूर्ण परिस्थितीची तंत्रशिक्षण संचलनालय, राज्य सीईटी सेलला माहिती असून, त्यावर तातडीने निर्णय का घेतला जात नाही, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांसह पालकांकडून उपस्थित केला जात आहे.




