पुणे | उवसग्गहरं स्तोत्रामध्ये विश्वकल्याणाची भावना

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वतःच्या हितासाठी केलेली प्रार्थना ही मंदिराच्या भिंतीवर आदळून माघारी येते. मात्र, उवसग्गहरं स्तोत्र स्वार्थावर आधारित नसून परमार्थावर आधारित आहे. या प्रार्थनेतील एक एक परमाणू जेव्हा वायूमंडलमध्ये पसरतो, तेव्हा त्यात सर्व जगाचे कल्याणच कल्याण होते, अशी भावना आर एम डी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी व्यक्त केली
जैनधर्मीय बांधवांमध्ये उवसग्गहरं स्तोत्र महामंगलकारी स्तोत्र असल्याची श्रद्धा असून, स्तोत्राच्या नियमित स्मरणामुळे दृष्टग्रह, रोगपीडा, शत्रू आदी सांसारिक दुःख दूर होतात आणि मनुष्य प्राणीमात्रांमध्ये सुख समृद्धी प्राप्त होते,
अशी धारणा आहे आणि म्हणूनच मागील आठ वर्षांपासून समाजबांधवांमध्ये सकारात्मकता आणण्यासाठी आणि त्यांना एकत्रितपणे जोडण्यासाठी स्तोत्राच्या आयोजनातून प्रयत्न करते, अशी भावना धारीवाल यांनी व्यक्त केली.
रविवारी (दि. २५) सायंकाळी ४ ते ५ या वेळेत आचार्य पद्मश्री चंदनाजी म. सा. आणि पू. श्री सुप्रियदर्शनजी म. सा. आदीठाणा- ५ यांच्या उपस्थितीत ‘उवसग्गहरं स्तोत्र’ सामूहिक पठणाचे आयोजन बिबवेवाडी येथील श्रीमान रसिकलालजी एम धारीवाल स्थानक भवनात आयोजित करण्यात आले होते.
या वेळी जैन -अजैन भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. आर एम डी फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन, उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांच्या द्वारे स्तोत्रपठणाचे आयोजन केले जाते.
ज्याप्रमाणे पाण्यात कंकर टाकला असता गोल- गोल वलय तयार होते, त्याच प्रमाणे उवसग्गहरं स्तोत्र पठण केल्यास सकारात्मक वलय आपल्यामध्ये येते.
त्याची प्रचितीसुद्धा आपल्याला आज मिळेल. ती सकारात्मक ऊर्जा आज तुम्ही येथून नक्कीच घेऊन जाणार, असे मार्गदर्शन आचार्य पद्मश्री चंदनाजी म. सा. यांनी या वेळी केले.
याप्रसंगी बालन ग्रुपचे अध्यक्ष युवा उद्योजक पुनीत बालन, आरएमडी स्थानकाचे अध्यक्ष पोपटशेठ ओसवाल आणि सर्व पदाधिकारी, विविध जैन संस्थांचे पदाधिकारी, नामवंत उद्योजक, तसेच शोभाताई आर धारीवाल वसतिगृह एफसी रोड,
शोभाबेन आर धारीवाल छात्रालय डेक्कन आणि शोभाताई आर धारीवाल वसतिगृह चिंचवड येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, विविध गणेश मंडळे, आळंदी येथील वारकरी संप्रदायाचे भाविक, तसेच जैन- अजैन बंधू भगिनी उपस्थित होते. स्तोत्र पठणानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.




