पुणे जिल्हा | जबाबदारीची जाणीव खेळातूनच होते

जुन्नर,(वार्ताहर)- शालेय मुलांनी रोजच्या अभ्यासा बरोबरच विविध खेळ आपल्या आवडीप्रमाणे खेळले पाहिजेत. जी मुले खेळत सहभागी होतात त्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, बुद्धिमत्ता वाढण्यास मदतच होते. तसेच विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव या खेळातूनच होते. शालेय संस्थांनी कला, क्रीडा, अकादमी सुरू करावी ज्या योगे मुलांची आकलन क्षमता वाढीस मदत होणार असल्याचे विचार मॅनेजमेंट ऑफ चाईल्ड डेव्हलपमेंट चे संजय मालपाणी यांनी व्यक्त केले.
जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालय आणि गाजरे बालक मंदिराचा सुवर्ण महोत्सव सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, जिल्हा नियोजन मंडळ सदस्या आशा बुचके, विघ्नहरचे उपाध्यक्ष अशोक घोलप, भाजप तालुका अध्यक्ष संतोष खैरे, संस्थेचे अध्यक्ष सुधीर ढोबळे, उपाध्यक्ष संजय बुट्टे पाटील, कार्याध्यक्ष धनेश संचेती, सेक्रेटरी अविनाश थोरवे, संचालक नितीन मेहता, राहुल जोशी, संजय मुथा, सुनिल गुरव, निलिमा जुन्नरकर, सुहास भगत, जितेंद्र देशमुख, आनंद सासवडे यांच्यासह संस्थेचे राज्य भरातील माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
1935 मध्ये ज्या मूल्यांच्या आधारे जुन्नर एज्युकेशन सोसायटीची स्थापना रा. प. सबनीसांनी केली. तीच नीतिमूल्ये या संस्थेत आजही राबविली जात आहेत. नवीन शिक्षण प्रणाली मुळे शिक्षणाची परिमाण बदलत आहेत. शैक्षणिक संस्थांनी कला, क्रीडा, अकादमी, योगा, प्राणायम शिक्षण विद्यार्थ्यांकरिता सुरू करून त्यातून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढवावी. गेल्या 50 वर्षात अनेक विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्वक शिक्षण देण्याचे काम या संस्थेने केलेले असून संस्कारक्षम प्राथमिक शिक्षणावरच विद्यार्थ्याची पुढील प्रगती अवलंबून असते असे संजय मालपाणी यांनी यावेळी स्पष्ट केले.
आशा बुचके म्हणाल्या शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थी घडविण्याचे काम शाळे बरोबरच पालकांची जबाबदारी सुद्धा मोठी आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत मिळालेल्या योग्य मार्गदर्शनातून स्वतः च्या बळावर प्रामाणिकपणे तत्व, निष्ठा ठेवून काम केले पाहिजे. शिक्षणाबरोबरच योग्यवेळी योग्य संस्कार मिळणे ही काळाची गरज आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष धनेश संचेती यांनी प्रस्थाविकामध्ये जुन्नर एज्युकेशन सोसायटी वाटचालीची माहिती देऊन यापुढील काळात राबविण्यात येणार्या नवीन शैक्षणिक उपक्रमाबाबतची माहिती दिली. संस्था आगामी काळात नवनवीन शैक्षणिक प्रकल्प सुरू करणार असून याकरिता माजी विद्यार्थी तसेच दानशूरांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. श्रद्धा वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले तर जितेंद्र देशमुख यांनी आभार मानले.
गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या अनेक पिढी घडविण्याचे काम या संस्थेने प्रामाणिकपणे केलेले आहेत. या संस्थेच्या यापुढील विविध शैक्षणिक उपक्रमांकरिता शासनाकडून योग्य ती मदत करण्यात येईल. -अतुल बेनके, आमदार जुन्नर





