Pune : युवागायकांच्या सादरीकरणाने रंगला “सवाई’चा दुसरा दिवस

पुणे : युवा गायक द्वयी कृष्णा बोंगाणे व नागेश आडगांवकर यांचे तयारीचे गायन आणि गायिका संगीता कट्टी यांनी रंगवलेला यमन यामुळे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना आगळावेगळा श्रवणानंद मिळाला.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल येथे ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गायक द्वयी कृष्णा बोंगाणे आणि नागेश आडगांवकर यांच्या तयारीच्या गायनाने झाली. आलापीतून रागरूप उभे करताना या दोन्ही गायकांनी एकमेकांना दाद देत, पूरक स्वराकृती मांडल्या. सरगमचाही उत्तम वापर त्यांनी केला. “कंगन मुंदरिया मोरी रे…’ ही द्रुत त्रितालातील रचनाही त्यांनी सादर केली. त्यानंतर मिश्र भिन्न षड्ज रागात “याद पिया की आये…’ ही प्रसिद्ध ठुमरी त्यांनी केरवा तालात भावपूर्णतेने गायिली. “मी गातो नाचतो आनंदे…’ ही मालकंस रागावर आधारित भक्तिरचना सादर करत त्यांनी विराम घेतला.
त्यानंतर कर्नाटक आणि उत्तर हिंदुस्थानी संगीतावर प्रभुत्व असणाऱ्या गायिका संगीता कट्टी कुलकर्णी यांचे स्वरमंचावर आगमन झाले. बहुविध सांगीतिक प्रतिभा असणाऱ्या कट्टी यांनी राग यमनमध्ये “मो मन लगन लागी…’ ही गाजलेली बंदिश सादर केली. “सखी एरी आली पियाबिन…’ “पिया की नजरिया…’ या त्यांनी गायलेल्या प्रसिद्ध बंदिशींना रसिकांनी दाद दिली.
संत श्री पुरंदरदास यांची रचना सादर करून संगीता कट्टी यांनी गायनाची सांगता केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी एका प्रेक्षकाच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी ठाण्याचे शुभानन आजगांवकर यांच्या हस्ते गायिका संगीता कट्टी आणि सहकलाकारांचा सत्कार करण्यात आला.





