नितीन राऊत वडूज – सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून सार्वजनिक गणेश मंडळांबरोबर घरगुती गणपतीचे देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. येथील माळी कुटुंबीयांनी अष्टलक्ष्मीचा देखावा साकारला असून तो पाहण्यासाठी गर्दी होत आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, येथील बांधकाम उद्योजक व अभियंता अविनाश माळी यांचे कुटुंबीय नेहमीच धार्मिक कार्यात अग्रेसर असते. यावर्षी त्यांच्या कुटुंबीयांनी घरगुती गणपतीसमोर अष्टलक्ष्मीचा देखावा साकार केला आहे. यामध्ये आदिलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, विजयलक्ष्मी, धनलक्ष्मी अशी लक्ष्मीची आठ रूपे साकारली असून या विविध रुपांची महती या देखाव्यातून विषद केली आहे. हा देखावा साकार करण्यासाठी या कुटुंबातील शीतल अविनाश माळी, ऋषाली अमर माळी, अनुप्रिता अभिजित माळी यांनी परिश्रम घेतले आहेत. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांनी या देखाव्याला भेट दिली.