युद्धामुळे रुपयाचे मूल्य कोसळले

मुंबई – रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जागतिक चलन बाजार अस्ताव्यस्त झाला आहे. बऱ्याच देशांनी आर्थिक निर्बंध जारी केल्यामुळे जागतिक वित्त व्यवस्थेवर आणि चलन व्यवस्थेवर परिणाम होत आहे. भारतीय रुपयाचे मूल्य गुरुवारी तब्बल 99 पैशांनी कोसळून रुपयाचा दर प्रति डॉलरला 75.60 रुपये झाला.
रिझर्व बॅंकेचे या घडामोडींकडे बारीक लक्ष आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक हस्तक्षेप करून रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत रिझर्व बॅंकेला आपल्याकडील डॉलरचा साठा विकावा लागतो. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने बऱ्याच वेळा डॉलरची विक्री करून रुपयाचे मूल्य स्थिर ठेवले आहे. भारताकडे जवळजवळ 635 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे.
त्यामुळे लघु पल्ल्यात भारताला या आघाडीवर फारशी चिंता करण्याची गरज नाही. मात्र कच्च्या तेलाचे दर 103 डॉलरवर गेले आहेत. हे महाग कच्चे तेल डॉलर मोजून विकत घ्यावे लागते. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठयावर दीर्घ पल्ल्यात परिणाम होऊ शकतो. तेलाचे दर वाढण्याबरोबरच भारतातील परदेशी गुंतवणूक वेगाने परत जाऊ लागली आहे.
त्याचबरोबर शेअर बाजाराचे निर्देशांकात कोसळल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत असल्याचे परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले. जागतिक पातळीवरील या परिस्थितीचा फक्त भारताच्या चलनावर परिणाम झालेला नाही तर डॉलर वगळून इतर सर्व चलनावर परिणाम होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे चलन क्षेत्रावरील विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले. महिनाअखेर आयात करणारे डॉलरची मागणी करतात. त्याचबरोबर बरेच जण डॉलर खरेदी करीत असल्यामुळे रुपयाचे मूल्य घसरत असल्याचे त्यांनी सांगितले.





