नवी दिल्ली – कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या पोर्ट ब्लेअर विमानतळाचे छत अतिवृष्टीमुळे कोसळल्याची घटना आज घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.अंदमान-निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टची इमारती उभारुन या इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 जुलै रोजी अभासी पद्धतीने उद्घाटन केले होते.
मात्र, अतिवृष्टीमुळे या नुकत्याच उभारलेल्या इमारतीचे छत कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन विरोधकांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका करायला सुरूवात केली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करताना म्हटले आहे की, आजकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही वास्तुचे उद्घाटन करुन मोकळे होतात. मग त्या वास्तुची गुणवत्ता काय आणि कशी आहे याबाबत कुठलीही माहिती घेत नाहीत.
या घटनेवर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खुलासा केला आहे की, घडलेला प्रकार हा टर्मिनल बिल्डिंगच्या बाहेरील आहे. तर येथे सीसी कॅमेरे लावण्यासाठी छतामध्ये छिद्र पाडण्यात आले होते. हे काम सुरु असतानाच हवेमुळे काही भाग कोसळला. आता सर्व ठिक असून, दुरुस्ती करण्यात आली आहे.
एका खासगी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या टर्मिनल इमारतीच्या उभारणीसाठी 710 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. या टर्मिनल इमारतीमध्ये एकाचवेळी 10 विमान पार्क होऊ शकणार आहेत. या इमारतीचा आकार शिंपल्यासारखा आहे.