Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे यांच्यासह ७० मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी जमावबंदी उल्लंघन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या कलमांत गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईतील नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळा चार महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतिक्षेत तसाच झाकून ठेवलेल्या अवस्थेत होता. अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह आवाज उठवत झाकून ठेवलेल्या पुतळ्याचे अनावर केले होते. या प्रकरणी त्यांच्यासह मनसैनिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रया समोर आली आहे. आता, महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल, तर भविष्यातही असे हजारो ‘गुन्हे’ मी अभिमानाने करेन, असा थेट इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे. महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल, तर भविष्यातही असे हजारो ‘गुन्हे’ मी अभिमानाने करेन! pic.twitter.com/Um0wGSiMwd — Amit Thackeray (@amitrthackeray) November 17, 2025 नेमकं काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे हे शनिवारी (१६ नोव्हेंबर) नवी मुंबईत पक्षाच्या विविध शाखा उद्घाटन कार्यक्रमांसाठी आले होते. त्यावेळी नेरूळमधील या पुतळ्याबाबत माहिती मिळाली. हा पुतळा चार महिन्यांपासून घाणेरड्या आणि फाटलेल्या कापडाने झाकून ठेवण्यात आला होता, तर अनावरणासाठी कोणताही नेता उपलब्ध नव्हता अशी माहिती त्यांना मिळाली. अमित ठाकरे यांचा आरोप महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही. नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी गेलो असताना समजलं की तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त लोकार्पणासाठी नेता मिळत नाही म्हणून घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवला आहे, असा आरोप अमित ठाकरे यांनी केला होता. टीका सवाल आणि खंत विमानतळ उद्घाटन, दहीहंडी, दिवाळी आणि दसरा सारख्या कार्यक्रमांसाठी नेते हजेरी लावत असताना स्वराज्य संस्थापक आणि आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी एक तासही वेळ देता येत नसल्याची खंत अमित ठाकरेंनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणारे आणि भाषणांतून टाळ्या घेणारे नेते पुतळ्याचे अनावरण करायला तयार नाहीत का? असा सवाल उपस्थित करत हे महाराष्ट्रात घडतंय, हेच लाजिरवाणं आहे, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली. हेही वाचा : रवीना टंडनच्या मुलीला मिळाली मोठी संधी! तेलुगू चित्रपटसृष्ट्रीत करणार धमाकेदार एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली…