रायरेश्वरच्या पायथ्याशी जरांगे पाटलांची गर्जना; “29 ऑगस्टला मुंबईत आरक्षणाचा गुलाल”

भोर : मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ऐतिहासिक रायरेश्वर किल्ल्यावर भेट देत स्वराज्यभूमीतून आरक्षणासाठी लढ्याचा नवा संकल्प केला. रिमझिम पावसात आणि दाट धुक्यात, मराठा बांधवांसोबत वळणावळणाच्या अवघड वाटा पार करत त्यांनी रायरेश्वर गडाची चढाई केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या शिवमंदिरात पोहोचताच जरांगे पाटलांनी शिवलिंगाचा अभिषेक करून विधिवत पूजा केली. “शिवमंदिराच्या पायऱ्यांवर पाऊल टाकताच अंगावर काटा आला,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी रायरेश्वर गडाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत, “या किल्ल्याचा हवा तसा विकास झालेला नाही. आता मी सरकारमधील सर्व नेत्यांशी बोलून विकासाच्या मागे लागणार आहे,” असे स्पष्ट केले.
आरक्षणाच्या विषयावर ठाम भूमिका घेत त्यांनी जाहीर केले, “मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे; त्याशिवाय दुसरे कोणतेही आरक्षण आम्ही घेणार नाही. 29 ऑगस्टला ‘चलो मुंबई’ आंदोलनासाठी प्रचंड प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होणार आहेत.”
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत त्यांनी स्पष्ट केले, “या निवडणुकांचा निर्णय समाज घेईल. मी आक्रमक भूमिका घेणार नाही; मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत.”
रक्षाबंधनानिमित्त सर्व भगिनींना शुभेच्छा देताना जरांगे म्हणाले, “ज्ञानेश्वरी मुंडे राखी बांधण्यासाठी येत आहेत, त्यामुळे मी आता अहिल्यानगरला निघालो आहे.”
महादेव मुंडे हत्या प्रकरणात ताईंनी केलेल्या तीन मागण्या पूर्ण केल्याचे सांगून त्यांनी पुढे म्हटले, “आरोपी पकडणे आता पोलिसांचे काम आहे. आमच्यात जातिवादाचे रक्त नाही. जातीच्या पलीकडे जाऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हाक दिली आणि आम्ही तिला न्याय मिळवून देण्यासाठी 100% काम केले.”





