पुणे जिल्हा | दोन वर्षांत पहिल्यांदाच वेळ नदीला पूर

पेठ, (वार्ताहर)– सातगाव पठार भागामध्ये मागील चार-पाच दिवसांपासून प रिमझिम पाऊस पडत होता कालपासून पावसाचा जोर वाढलेला संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वेळ नदीला मागील दोन वर्षांपासून पहिल्यांदा पूर आला आहे.
वेळ नदीला आलेला पूर पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. नदीला पूर आल्यामुळे दशक्रिया विधी घाट आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. अनेक जण सुरक्षित प्रवासासाठी बाहेरील पुलाचा वापर करत आहे पण आज सुद्धा काहीजण जीव धोक्यात घालून जुन्या पुलावरून पाणी असताना सुद्धा त्यातून गाडी घालताना दिसत आहे.
सततचा पडत असलेला पाऊस त्यामुळे विहिरींची पाणी पातळी वाढण्यास निश्चित मदत होईल. भविष्यातील पाणीटंचाई झालेल्या पावसामुळे टळण्यास मदत होणार असून पेठ गावांमध्ये आत्तापर्यंत पाच टँकर चालू होते पण कालपासून दोन टँकर कमी करून तीन पाणी टँकर सुरू आहेत. -संजय पवळे, सरपंच पेठ
झालेल्या पावसामुळे शेतकरी समाधानी आहे; पण पावसाचा जोर असाच वाढत राहिल्यास तरकारी पिके धोक्यात येतील तसेच अति पावसामुळे बटाटा पिकावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पावसाने आता उसंती घेतली पाहिजे -जयसिंग एरंडे. जिल्हा सहसंपर्कप्रमुख भाजपा
सध्या झालेला पाऊस समाधान असून पावसाचा जोर असाच राहिला तर वाटाणा, टोमॅटो, मिरची यांसारख्या तरकारी पिकांना धोका उत्पन्न होऊ शकतो. तसेच विहिरीवरील विद्युत कनेक्शनला हात लावताना शेतकरी वर्गाने काळजी घ्यावी. -अशोक बाजारे, युवा उद्योजक





