प्रभात वृत्तसेवा पुणे- पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एप्रिल महिन्यात धावपट्टीच्या शेजारीच रात्रीच्या वेळी बिबट्या दिसला होता. यामुळे विमानतळ प्रशासनाने वनविभागाकडून तातडीने पावले उचलत रेस्क्यू टीमला पाचारण केले. बिबट्याच्या अस्तित्त्वाच्या खुणा सापडल्या, कॅमेऱ्यात त्याची उपस्थिती कैद झाली. मात्र. बिबट्या आजपर्यंत रेस्कू टिमच्या हाती लागेला नाही. आता, बिबट्याला पकडण्यासाठी वेगळ्या प्रकारे डिझाइन केलेले पिंजरे परिसरात लावण्यात येणार आहेत, असे पुणे विभाग मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी सांगितले. भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यामुळे मे महिन्यात बिबट्याचे ऑपरेशन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. पुणे विमानतळ हा एअरफोर्स बेस असल्यानेही हाय अलर्टवर होता आणि सुरक्षा प्रोटोकॉलमुळे तळावर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. विमानतळ कर्मचाऱ्यांच्या पाहणी अहवालानंतर वनविभागाने १७ मे रोजी पुन्हा ऑपरेशन सुरू केले. रेस्क्यू टिमने बिबट्याच्या हालचाली प्रतिबंधित करण्यासाठी पाच कि.मी.च्या परिसराला वेढा घातला होता. त्यानंतरही वन विभागाच्या हाती बिबट्याला लागलेला नाही. त्यामुळे आता वनविभाग या ऑपरेशनसाठी आपली रणनिती बदलण्याच्या विचारात आहे. बिबट्याला पकडण्याच्या आव्हानाशिवाय वनविभागाला हवाई दलाच्या परिसराच्या संवेदनशील भागात हालचालींवर निर्बंध यासारख्या काही ऑपरेशन आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. विमानतळ परिसरातील बिबट्या त्याचे स्थान तो सतत बदलत आहे. बिबट्यामुळे कोणत्याही उड्डाण ऑपरेशनवरही परिणाम झाला नाही हे दिलासादायक असले तरी रेस्क्यू टीम बिबट्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, हा संवेदनशील परिसर असल्याने त्याला पकडण्याच्या कामावर मर्यादा येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या बिबट्याला या पिंजऱ्याची सवय होती, जेणेकरून तो आधी कधीतरी पकडला गेला असावा, अशी शक्यता असल्योन पिंजऱ्याची डिझाइन बदलण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. महादेव मोहिते, उपवनसंरक्ष, पुणे वनविभाग