Mumbai Boat Accident : मुंबई बोट अपघाताचे खरे कारण आले समोर; कर्मचाऱ्याने दिली माहिती

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईच्या समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटेनं नीलकमल बोटीला धडक दिली. या अपघातात 15 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या बोटीमध्ये नौदलाचे ३ कर्मचारी होते. या अपघाताच्या पाच दिवसानंतर आता खरे कारण समोर आले आहे. नेव्हीच्या बोटीचा स्टीअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाला असल्याचे अपघातात वाचलेल्या कर्मचाऱ्याने सांगितले आहे.
बोट अपघातात दुर्घटनेत बचावलेले कर्मचारी कर्मवीर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी बोटीची पाहणी करण्यात आली होती. बोटीच्या नव्या इंजिनच्या टेस्टिंगचे ट्रायल सुरू असताना अचानक स्टेअरिंग लॉक झाले. तांत्रिक बिघाड झाल्याने बोटीचे स्टिअरींग लॉक झाले त्यामुळे बोट वळवता आली नाही आणि ती सरळ जाऊन नीलकलम बोटीला धडकली. कर्मवीर यादव यांनी गोव्यात नुकतेच (CD-3) प्रशिक्षण पूर्ण केले होते त्यानंतर त्यांची बदली मुंबईला करण्यात आली होती.
नेमका कसा घडला अपघात?
मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीला एक सुसाट स्पीड धडकली. मुंबईजवळील बुचर आयलंड जवळ 3 वाजून 55 मिनिटांनी नीलकमल नावाच्या फेरीबोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिली. या अपघातात 101 लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. मात्र दुर्दैवाने या अपघातात १५ जणांना आपला जीव गमवावा लागला.





