Ram Mandir Trust : राम मंदिर ट्रस्टने सीईओची निवड एका महिन्यासाठी पुढे ढकलली
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आपल्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सीईओ) निवड एका महिन्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Ram Mandir Trust – श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आपल्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सीईओ) निवड एका महिन्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या पदासाठी तब्बल ५,२०० अर्ज प्राप्त झाले असून, वाढत्या प्रशासकीय गरजा भागवण्यासाठी हंगामी सरचिटणीसांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये चालू श्रावण महिन्यात भाविकांच्या वाढत्या संख्येचे नियोजन, रिक्त विश्वस्त पदांची भरती आणि इतर प्रशासकीय व आर्थिक मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर ट्रस्टचे हंगामी सरचिटणीस कृष्ण मोहन आणि कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी पत्रकारांना माहिती दिली.
गोविंद देव गिरी यांनी स्पष्ट केले की, सीईओ निवडीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने प्राप्त झालेल्या प्रचंड अर्जांच्या छाननीसाठी अतिरिक्त वेळेची मागणी केली होती. त्यानुसार ट्रस्टने समितीला एक महिन्याचा अतिरिक्त वेळ मंजूर केला आहे.
राम मंदिराच्या सर्व धार्मिक बाबींवर आणि कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी एका कायमस्वरूपी धार्मिक समितीची स्थापना करण्याचा निर्णयही ट्रस्टने घेतला आहे. या धार्मिक समितीत एकूण ९ साधू-संतांचा समावेश असेल. यापैकी ५ संत अयोध्येतील असतील, तर ४ संत अयोध्येबाहेरील असतील.





