पुणे | लष्कराच्या हद्दीतून आले पावसाचे पाणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – धानोरी आणि कळस परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने लक्ष्मीपार्क परिसरात डोंगराच्या बाजूला असलेल्या लष्कराच्या शुटींग रेंज मधून मोठया प्रमाणात पावसाचे पाणी तसेच राडारोडा वाहून आला. परिणामी, या भागातील अनेक घरांत तसेच दुकानात पावसाचे पाणी शिरले. दुकाने आणि वाहनांचेही नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी केली.
लष्कराच्या हद्दीतून या भागात दरवर्षीच पाणी येत असल्याने मोठे नुकसान होत असल्याने लष्कराच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश आयुक्तांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत.
अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी., पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, परिमंडळ उपायुक्त किशोरी शिंदे, कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे, अधिक्षक अभियंता दिनकर गोजारे यावेळी उपस्थित होते.
नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा…
महापालिका आयुक्त या भागात पाहणीसाठी गेल्यानंतर या भागातील नागरिकांंनी तक्रारींचा पाढाच वाचला, या ठिकाणी एका सोसायटीची भिंत पडून अनेक घरांंमध्ये पाणी शिरले तसेच नाल्यावर अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे केल्याने दरवर्षीच नागरिकांना पावसाळ्यात मोठया त्रासाला सामोरे जावे लागते. महापालिकेने काय ते काम करून त्रासातून मुक्त करावे तसेचनुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
तातडीच्या कामांना सुरूवात…
महापालिकेकडून तातडीने या भागात कामास सुरूवात केली आहे. पावसाळी पाण्याला वाट मिळवून देण्यासाठी जलवाहिनी स्वच्छ करण्यात आली आहे तसेच, पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी लोखंडी पावसाळी जाळ्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या सखल भागात पाणी साचत आहे तेथे पालिकेकडून उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत.




