पिंपरी | पावसाने धीर धरला, म्हणून मतदारांनी तग धरला

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड व पिंपरी विधानसभा मतदारसंघ वगळता इतर विधानसभा मतदारसंघात तुरळक तर गारांचा अवकाळी पाऊस झाला. त्याचा परिणाम मतदानावर झाला. मात्र, पिंपरी व चिंचवडमधील भागात पावसाचे वातावरण झाले असताना पावसाने धीर धरला, त्यामुळे मतदारांनीही तग धरला, नाहीतर आता झालेल्या मतदानांपेक्षा कमी मतदान झाले असते. असा तज्ञांचा अंदाज आहे.
दुपारनंतर घाटाखाली गारांचा जोरदार पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्याचा साहजिकच मतदानावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. पावसामुळे तयार झालेल्या गारठ्याच्या वातावरणामुळे मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले.
मात्र, घाटावरील म्हणजेच मावळ विधानसभेतील काही भागात तसेच पिंपरी, चिंचवड विधानसभेत पावसाने धीर धरला. त्यामुळे काही प्रमाणात तरी मतदान जास्त झाले. अन्यथा आहे त्या टक्केवारीत घसरण झाली असती, असे बोलले जात आहे.





