Rani Mukherjee : राणी झाली भावूक! साता समुद्रापार विशेष पुरस्काराने सन्मान; म्हणाली “आपले काम एक दिवस..”
Rani Mukherjee : तिच्या मते, चित्रपट हे असे माध्यम आहे जे जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करते, कारण मानवी भावनांना कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिसाची गरज नसते.

Rani Mukherjee : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मेलबर्न येथे आयोजित इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) मध्ये राणीला तिच्या दमदार अभिनयासाठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना राणी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर राणीने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “माझ्या चित्रपटांमधील भूमिका केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर प्रत्येक पात्राने एक चांगली व्यक्ती बनण्यासही शिकवले. एका तरुण मुलीच्या रूपात चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना आपले काम एक दिवस सातासमुद्रापार पोहोचेल, याची कधी कल्पनाही केली नव्हती.” असे सांगताना ती भावूक झाली होती.
ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांनी भारतीय चित्रपटसृष्टीला आणि तिलाही नेहमीच भरभरून प्रेम व आदर दिल्याचे राणीने आवर्जून नमूद केले. तिच्या मते, चित्रपट हे असे माध्यम आहे जे जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करते, कारण मानवी भावनांना कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिसाची गरज नसते.
आपल्या तीन दशकांच्या प्रवासाकडे पाहताना राणीने पडद्यावर सशक्त आणि विविधांगी स्त्री व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तिच्या पात्रांनी मनमोकळेपणाने हसणे, मनापासून प्रेम करणे, अन्यायाविरुद्ध निर्भयपणे लढणे आणि स्वतःवरील विश्वास कायम ठेवणे शिकवले.
३० वर्षांचा दमदार प्रवास
राणी मुखर्जीची चित्रपटसृष्टीतील ३० वर्षांची कारकीर्द दमदार राहिली आहे. ‘ब्लॅक’, ‘हम तुम’, ‘युवा’, ‘बंटी और बबली’, ‘हिचकी’, ‘मर्दानी’ आणि ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचे वेगळे पैलू तिने प्रेक्षकांसमोर उलघडले. १३ ऑगस्टपासून सुरू झालेला इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न २३ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात मिळालेला विशेष सन्मान राणीच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा गौरव करणारा ठरला आहे.






