Operation Tiger : “निवडणुकीत जनताच भाजपला प्रत्युत्तर देईल”; अखिलेश यादव यांचा इशारा !
भाजप लोकशाही मुल्यांना कमजोर बनवत आहे. तसेच, लोकशाही प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करत आहे. मात्र, उत्तरप्रदेशातील जनता पूर्णपणे जागरूक आहे.

Operation Tiger – भाजप लोकशाही मुल्यांना कमजोर बनवत आहे. तसेच, लोकशाही प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करत आहे. मात्र, उत्तरप्रदेशातील जनता पूर्णपणे जागरूक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच भाजपला प्रत्युत्तर देईल, असा इशारा समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिला.
देशातील काही राजकीय पक्षांमध्ये फुटीचे सत्र सुरू आहे. त्यासाठी विरोधकांकडून भाजपला जबाबदार धरले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, सपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना अखिलेश यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपचे खोटारडेपणाचे आणि लुटीचे राजकारण जनतेच्या ध्यानात आले आहे.
त्या पक्षाकडून सत्तेचा गैरवापर केला जातो. लोकशाहीत सत्तेचा अंतिम स्त्रोत जनताच असते. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपच्या युक्त्यांचे राजकारण यशस्वी ठरणार नाही. त्या पक्षाला मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल, असे अखिलेश म्हणाले.
उत्तरप्रदेशात पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत विधानसभा निवडणूक होईल. त्यासाठी आठ ते नऊ महिन्यांचाच अवधी उरला आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक जवळ येऊ लागल्याने राजकारण तापू लागले आहे. त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.




