Nagar : स्वस्त धान्य दुकानात इ पॉश मशीनच्या समस्या गंभीर

संगमनेर : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये इ पाॅझ मशिनच्या समस्या गंभीर झाली असल्याने लाभधारकांना धान्य मिळत नाही. याबाबत ताताडीने उपाय योजना करून धान्य मिळेल, अशी मागणीआमदार अमोल खताळ यांनी करत सध्या सुरू असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे .
विधानसभेत औचित्याच्या मुद्दयावर आ.खताळ यांनी तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांमध्ये ऑनलाइन प्रणालीद्वारे पाॅझ मशिनमुळे निर्माण होत असलेल्या अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले. तालुक्यामध्ये ६५ हजारांहून अधिक रेशनकार्ड धारक असून शासनाच्या अंत्योदय कार्ड आणि प्राधान्य कार्ड या योजनेतून धान्य मिळत असलेल्या लाभार्थीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
परंतु दुकानात असलेल्या पाॅझ मशिनच्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक गोरगरीब नागरिकांना आपला कामधंदा सोडून दिवसभर स्वस्त धान्य दुकानांच्यासमोर ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना धान्य न घेता आर्थिक व मानसिक त्रास सहन करत माघारी फिरावे लागण्याची दुर्दैवी वेळ येत असल्याची बाब आ. खताळ यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.




