#INDvWI 1st Test : कोहलीपुढे समस्या संघाच्या व्यूहरचनेचीच

अँटिग्वा – वेस्ट इंडिजविरूद्ध गुरूवारपासून भारताचा पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू होणार असून या सामन्यासाठी खेळाडूंची व्यूहरचना कशी असावी या समस्येने भारताचा कर्णधार विराट कोहलीस चिंतेत टाकले आहे.

सहसा येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजीस असते. त्यामुळे चार वेगवान व एक फिरकी गोलंदाज खेळावयाचे झाल्यास रोहित शर्मा व अजिंक्‍य रहाणे यांच्यापैकी एकास विश्रांती द्यावी लागणार आहे. लोकेश राहुलने मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये चांगले यश मिळविले असले तरी कसोटीमधील त्याची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्याला वगळण्याचा निर्णय झाला तर त्याच्याऐवजी रहाणेला सलामीस पाठविले जाण्याची शक्‍यता आहे.

रहाणेने वेस्ट इंडिज “अ’ संघाविरूद्धच्या सामन्यात अर्धशतक टोलवित अपेक्षा उंचावल्या आहेत. मयांक अग्रवालला या सामन्यात अपयशास सामोरे जावे लागले होते. याच सामन्यात अर्धशतक करणारा हनुमा विहारी याचेही नाव सलामीसाठी घेतले जात आहे. चेतेश्‍वर पुजारा व कोहली हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर फलंदाजीस येतील. पाचव्या क्रमांकासाठी रोहित व रहाणे यांच्यात चुरस आहे. ऋषभ पंत हा 6 व्या क्रमांकावर खेळावयास येईल.

संघात चारच गोलंदाज खेळावयाचे झाल्यास जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा या वेगवान गोलंदाजांबरोबर एका फिरकी गोलंदाजास संधी दिली जाईल. रवीचंद्रन अश्‍विन व कुलदीप यादव या दोन फिरकी गोलंदाजांपैकी एकाचा समावेश केला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.