Satara | निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रणालयांनी सूचनांचे पालन करावे

सातारा (प्रतिनिधी) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मुद्रणालयांना कोणतेही उल्लंघन करु नये निवडणक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे असे न केल्यास राज्याचा संबंधित कायद्यान्वये मुद्रणालयाचे लायसन्स रदद करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.
कोणत्याही व्यक्तीला, दर्शनीभागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही निवडणूकपत्रक किंवा भित्तिपत्रक मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही.
कोणत्याही व्यक्तीला निवडणूकपत्रक किंवा भित्तिपत्रक ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे याबद्दलचे स्वतः स्वाक्षरित केलेले आणि दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन त्याने मुद्रकाला दोन प्रतीमध्ये दिल्याशिवाय आणि तो दस्तऐवज मुद्रित झाल्यानंतर वाजवी मुदतीच्या आत, मुद्रकाने त्या कागदाच्या एका प्रतीसह अधिकथनाची एक प्रत जिल्हादंडाधिकारी यांना पाठविल्याशिवाय मुद्रित करता येणार नाही.
भित्तीपत्रक “याचा अर्थ, उमेदवाराच्या किवा उमेदवारांच्या एखाद्या गटाच्या निवडणुकीचे प्रचालन करण्यासाठी किंवा निवडणुकीला बाधा आणण्यासाठी वाटण्यात आलेले कोणतेही मुद्रितपत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किंवा निवडणुकीशी संबंधित असा घोषणाफलक किंवा भित्तिफलक असा होतो,
पण निवडणूक सभेचा दिनांक, वेळ, ठिकाण आणि इतर तपशील किंवा निवडणूक प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते यांच्यासाठी नेहमीच्या सूचना जाहीर करणारी हस्तपत्रके, घोषणाफलक किंवा भित्तिपत्रक यांचा समावेश होत नाही.
जिल्हा निवडणूक अधिकारी मुद्रणालयाकडून कोणतेही पत्रक किंवा भित्तिपत्रक, इत्यादी मिळाल्या बरोबर प्रकाशकाने व मुद्रकाने कायद्याचे व आयोगाच्या निर्देशाचे पालन केले आहे किवा कसे याची तपासणी करून त्याची एक प्रत, कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल.
म्हणजे सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व अन्य इतर संबंधित व्यक्ती, कायद्याच्या शर्तीचे पालन करण्यात आले आहे किंवा कसे हे तपासू शकतील, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. डुडी यांनी कळविले आहे.





