सार्वजनीक ठिकाणी विकृती वाढली
पुणे,दि.9
बालक तसेच महिलांवर अत्याचारामागे पूर्वी झालेले वाद-विवाद, परिचय आणि विकृती ही तीन प्रमुख कारणे आहेत. बालकांवर झालेल्या अत्याचारांच्या बहुतांश घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तींनी अत्याचार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामागे विकृती हे देखील प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष एसएनडीटी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी काढला आहे. तसेच हे अत्याचार शहरातील महाविद्यालये, शाळा, अर्धवट बांधकामे, भुयारी मार्ग , सार्वजनीक शौचालये अशा ठिकाणी घडल्याचे निदर्शणास आले आहे.
पुणे शहरात मागील काही वर्षांपासून महिला तसेच बालकांवर अत्याचारांचे प्रमाण वाढीस लागले आहे. अशा प्रकारच्या घटना वाढीस लागल्यानंतर या मागची कारणे शोधण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी प्रयत्न सुरू केले. एसएनडीटी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. माधवी कुलकर्णी, डॉ. मधुरा जोशी, डॉ. मानसी राजहंस, डॉ. वासंती जोशी यांनी पोलिसांनी उपलब्ध करून दिलेल्या अत्याचार तसेच विनयभंग या कलमांन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा कागदपत्रांची पाहणी केली. शहरातील तीस पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांचे विश्लेषण केले. पीडीत बालक, त्याचे नातेवाईक तसेच पीडीत महिलेने दिलेले जबाब वाचण्यात आले. घटनास्थळ, आरोपी, पोलिसांनी दाखल केलेली कलमे हे मुद्दे अभ्यासासाठी विचारात घेण्यात आले.
या अभ्यासातून काढलेला निष्कर्ष शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कुलकर्णी, डॉ.जोशी, डॉ. राजहंस, डॉ. जोशी यांनी मांडला. यावेळी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह उपस्थित होते. डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, 2016 मध्ये पुणे पोलिसांच्या अख्यतारीतील विविध पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे 498 गुन्हे दाखल झाले होते. 2017 मध्ये 508 आणि 2018 मध्ये 457 गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचा सखोल अभ्यास तसेच कारणमीमांसा करण्यासाठी मी तसेच डॉ. जोशी, डॉ. राजहंस, डॉ. जोशी यांनी प्रत्येकी 112 दाखल गुन्ह्यांची कागदपत्रे पडताळली.
पीडीत महिला तसेच बालकांनी दिलेल्या जबाबातील मुद्दे विचारात घेण्यात आले. तसेच प्रत्येक जबाब काळजीपूर्वक वाचला. यातून पूर्वी झालेले वाद-विवाद, परिचय आणि विकृती ही तीन प्रमुख कारणे आढळून आली तसेच समाजमाध्यमाचा वापर करून काही गुन्हे घडले होते. त्याचेही प्रमाण जाणून घेतले. 12 ते 15 वर्ष वयोगट केंद्रस्थानी मानून विश्लेषण करण्यात आले. 12 वर्षांखालील पीडीत बालिका तसेच बालकांचे जबाब वाचण्यात आले. घटनास्थळाची माहिती घेण्यात आली, असे त्यांनी नमूद केले.
महिला आणि बालकांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनास्थळाची माहिती अभ्यासअहवालात घेण्यात आली असून पुणे शहरातील पाच पोलीस ठाण्यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे सर्वाधिक घडले आहेत. अर्धवट बांधकामे, वस्तीभागातील स्वच्छतागृहे, शाळांचा परिसरात, शहरातील निर्जन भागात अशा प्रकारचे गुन्हे घडले आहेत. काही गुन्हे भुयारी मार्गात घडली आहे. कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडले आहेत. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. वस्ती भागातील गुन्ह्यांचे विश्लेषणावर भर देण्यात आला असल्याचे निरीक्षण एसएनडीटी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अभ्यास अहवालात नोंदविले आहे. काही प्रकरणात तर किरकोळ कौटुंबिक वादातून महिलांनी विनयभंगाच्या तक्रारी दाखल केल्याचे निदर्शनास आले होते.
————————–
सज्ञान महिलांवर झालेले अत्याचार
पूर्वविवाद- 42.45 टक्के
विकृती- 30.44 टक्के
आमिष- 3.6. टक्के
समाजमाध्यम-23.46 टक्के
—————
अल्पवयीन मुलींवर झालेले अत्याचार
पूर्वविवाद- 19.19 टक्के
विकृती- 50.58 टक्के
आमिष- 4. 04टक्के
समाजमाध्यम-26.26 टक्के
—————-
शहरातील महाविद्यालये, शाळा, अर्धवट बांधकामे, भुयारी मार्ग परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे. वस्ती भागातील रहिवाशांनी अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे. गैरप्रकारांची माहिती पोलिसांना दिल्यास अशा प्रकाराच्या गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होईल.
– अशोक मोराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे