श्रीलंकेच्या अध्यक्षांनी संसद केली विसर्जित

कोलंबो : श्रीलंकेचे नूतन अध्यक्ष दिसानायके यांनी संसद विसर्जित केली असून दोनच महिन्यात नव्याने संसदेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर पहिल्याच दिवशी दिसानायके यांनी संसद विसर्जित करण्याच्या आदेशांवर स्वाक्षरी केली असून मंगळवारी मध्यरात्रीपासूनच संसद विसर्जित करण्यात आल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे. आता १४ नोव्हेंबर रोजी संसदेच्या मुदतपूर्व निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच दिसानायके यांनी संसदेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याचे सूतोवाच केले होते. आपल्या त्या घोषणेची अंमलबजावणी त्यांनी लगेचच केली आहे. श्रीलंकेत ऑगस्ट २०२० मध्ये संसदेच्या निवडणुका झाल्या होत्या. संसदेची मुदत संपण्याच्या ११ महिने आगोदरच संसद विसर्जित करून फेरनिवडणुकांची घोषणा केली गेली आहे.
मात्र या वर्षी निवडणुका घेण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली गेलेली नाही. अर्थसंकल्पीय वाटप न करताही निवडणूक पार पाडण्यासाठी अध्यक्ष कायदेशीरदृष्ट्या बांधील आहेत. निवडणुका घेण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने वेळेपूर्वी निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, असे विक्रमसिंघे म्हणाले होते.





