सप्तशृंगी गडावर ‘बोकड बळी’ची प्रथा पुन्हा सुरू, उच्च न्यायालयाची परवानगी

नाशिक – सप्तशृंगी गडावर बोकड बळीची प्रथा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या दसऱ्याच्या मुहूर्तापासून पाच वर्षांपासून बंद करण्यात आलेली बोकड बळीची प्रथा पुन्हा भाविकांना अनुभवता येणार आहे. ही प्रथा पुन्हा सुरू व्हावी यासाठी आदिवासी विकास संस्थेच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयाने सुनावणी देत प्रथेला पुन्हा परवानगी दिली आहे.
सध्या नवरात्र पर्व सुरु असून काही दिवसांपासून चर्चेत असलेला सप्तशृंगी गड पुन्हा चर्चेत आला आहे. येथील सप्तशृंगी गडावर दसऱ्याच्या दिवशी पूर्वीपासून सुरु असलेली बोकड बळी देण्याची प्रथा पुन्हा एकदा सुरु होणार आहे. ही प्रथा पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केलेली होती. प्रथा पुन्हा सुरू करण्यासाठी दाखल जनहित याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी होवून न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल देत अटी-शर्तीनूसार बोकड बळी देण्याची प्रथा परंपरा पूर्ववत सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सप्तशृंगी देवीचे मंदिर सर्वपरिचित आहे. या गडावर दरवर्षी बोकड बळी दिला जात असे. मात्र पाच वर्षांपूर्वी बोकड बळीच्या परंपरेवर तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांनी बंदी घालण्यात आली होती. याच बंदी विरोधात सुरगाणा तालुक्यातील धोडांबे येथील आदिवासी विकास संस्थेने जुलै 2019 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. आज याचिकेवर सुनावणी होऊन आदिवासी विकास संस्थेच्या बाजूने निकाल देण्यात आला आहे.





