मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता

हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
मुंबई : मुंबई आणि उपनगर परिसरात मागच्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागामध्ये पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. आता मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात जास्त पाऊस पडण्याची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या सतर्कतेनंतर महापालिका सज्ज झाली आहे तसेच डिझास्टर मॅनेजमेंटसह इतर यंत्रणेला अलर्ट केल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे. तर तिकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गसोबत गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात येत्या दोन दिवसात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.





