कोकणातील राजकीय वातावरण तापलं; माजी आमदाराची ‘या’ कारणामुळे ठाकरे गटातून हकालपट्टी

Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकांनंतर कोकणातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेना प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार संजय कदम हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासोबत संजय कदम यांची मुंबईमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची चर्चा होत आहे.
मात्र, त्यापूर्वीच दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कदम यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केली आहे. याबाबत पत्रक देखील जारी करण्यात आले आहे.
कोण आहेत संजय कदम ?
खेड तालुक्यातील चिंचघर येथील संजय कदम यांनी सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते, याशिवाय त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद ही भूषवलं होतं. 2014 साली ते सूर्यकांत दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवून दापोली मतदारसंघाचे आमदार झाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांच्यावर उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या मशाल चिन्हावर संजय कदम यांनी निवडणूक लढवली. परंतु, दापोली मतदारसंघातील आमदार योगेश कदम यांनी त्यांचा 25 हजार मतांनी पराभव केला. 2019 मध्येही संजय कदम यांचा पराभव झाला होता.
विशेष म्हणजे एकेकाळी माजी मंत्री व शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे कट्टर विरोधक संजय कदम मानले जायचे. मात्र आता संजय कदम यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर रामदास कदम व संजय कदम यांच्यातील टोकाच राजकीय वैमनस्य संपणार असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा:




