काश्मीरमधील निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणण्याचा डाव उधळला

जम्मू -जम्मू शहराच्या हद्दीलगत गुरूवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. सुरक्षा दलांनी राबवलेल्या यशस्वी मोहिमेमुळे काश्मीरमधील निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणण्याचे नापाक मनसुबे उधळले गेले.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर नागरोटा भागातील टोल नाक्यावर सुरक्षा जवानांनी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास तपासणीसाठी एक ट्रक रोखला. ट्रक थांबवून चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे आणखी सतर्क झालेल्या पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी ट्रकला घेरले. सुरक्षा जवानांना पाहून ट्रकमधून प्रवास करणाऱ्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली.
त्यावेळी दहशतवाद्यांनी ग्रेनेडही डागले. दहशतवाद्यांकडे शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा असल्याचे लक्षात आल्याने चकमकस्थळी आणखी सुरक्षा जवान पोहचले. जवळपास तीन तास चाललेल्या चकमकीत चारही दहशतवादी मारले गेले. तर दोन पोलीस जखमी झाले. ट्रकमध्ये 11 एके रायफल्स, 3 पिस्तुल आणि मोठ्या संख्येने ग्रेनेड आढळले.
चकमकीत ठार झालेले चारही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे समजते. त्यांनी अलिकडेच भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचा अंदाज आहे. ट्रकमधून प्रवास करणारे दहशतवादी काश्मीर खोऱ्यात पोहचण्याच्या प्रयत्नात होते. जम्मू-काश्मीरमध्ये 28 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचे पाकिस्तानचे मनसुबे आहेत. त्यातून पाकिस्तानातून भारतीय हद्दीत शिरकाव करण्याचे दहशतवाद्यांचे प्रयत्न वाढले आहेत. दहशतवाद्यांचा नवा गट निवडणूक प्रक्रियेवेळी घातपात घडवण्याच्या उद्देशातूनच काश्मीर खोऱ्यात जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे त्या गटाचा डाव उधळला गेला.





