हैद्राबाद बलात्कार प्रकरण: ज्या ठिकाणी केले दुष्कर्म तिथेच केला आरोपींचा खात्मा

नवी दिल्ली : हैद्राबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला नंतर जिवंत जाळल्याच्या प्रकरणातील चारही आरोपी आज सकाळी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. तेलंगणा पोलिसांनी या एन्काऊंटरला दुजोरा दिला आहे. सर्व आरोपींना शुक्रवारी सकाळी ज्या ठिकाणी त्यांनी दुष्कर्म केले, तिथे नेण्यात आले होते. त्यावेळी चारही आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे चौघेही जण मारले गेले. जिथे त्यांनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. तिथेच त्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. उड्डाण पुलाच्या खालीच ही घटना घडली.
Hyderabad: Heavy police presence at the spot where accused in the rape and murder of the woman veterinarian were killed in an encounter earlier today. #Telangana pic.twitter.com/tpIzyBgxdZ
— ANI (@ANI) December 6, 2019
या प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी न्यायालयात सर्व आरोपींची 10 दिवस पोलिस कोठडी गेल्या सोमवारी मागितली होती. पण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे हे सर्व आरोपी सायबराबाद पोलिसांच्या ताब्यात होते. ही घटना घडल्यानंतर 36 तासांच्या आत पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली होती.
बलात्काराच्या या घटनेनंतर देशभरात रोष व्यक्त करण्यात आला होता. आरोपींना तातडीने शिक्षा सुनावली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामान्यांनी व्यक्त केली होती. पण चारही आरोपी त्याच ठिकाणी एन्काऊंटरमध्ये मारले गेल्याने काही नागरिकांनी आनंद व्यक्त केला. बलात्कार करणाऱ्यांवर कायद्याचा आणि पोलिसांचा जरब बसलाच पाहिजे, अशी अपेक्षा काही महिलांनी व्यक्त केली.




