पुणे | कॅन्टोमेंटचा टक्का दुपारनंतर वाढला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा मतदार संघासाठी कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघात मतदारांचे नाव यादीत नसल्याने गोंधळ झाल्याचे अनेक ठिकाणी पहायला मिळाले. याचा राग प्रशासनावर काढण्यात येत होता. दरम्यान, सकाळी अकरा वाजेपर्यंत सहाही विधानसभा मतदार संघांपैकी कॅन्टोमेंटमधील टक्केवारी सर्वाधिक कमी राहिली.
कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत १३. ९४ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी एक वाजेपर्यंत-२३.२१ टक्के, दुपारी एक ते चार वाजेपर्यंत मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने ही टक्केवारी अचानक वाढली. पाच वाजता कॅन्टोमेंटची मतदानाची टक्केवारी ४४.१ झाली होती.
या मतदारसंघात लष्कर पोलीस ठाण्याअंतर्गत २८ बुथ येतात. यातील शाहदवल बाबा चौकातील शाळेतील बुथवर मात्र सकाळपासूनच गर्दी होती. ती दुपारपर्यंत कायम होती. अल्पबचत भवन आणि घोरपडी परिसरात मात्र सकाळच्या टप्प्यात गर्दी कमी होती. यानंतर नागरिक घराबाहेर पडले.
काही मतदारांचे नाव कोणत्याही बुथवरील यादीत नव्हते. काही नागरिक तर तीन ते चार केंद्र फिरुन आल्यानंतरही त्यांना नाव सापडले नाही. यामुळे मतदानाशिवाय घरी परतावे लागले होते. याचा संताप मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
घोरपडी परिसरही कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघात येतो. येथे सकाळपासून शांततेत मतदान सुरु होते. मात्र, मतदानासाठी गर्दी तुरळक होती. सकाळपर्यंत उत्साह कमी जाणवत होता. दुपारी एक ते चार नंतर मतदान अचानक वाढले.सायंकाळी पाच वाजता ४४.१ टक्के मतदान झाले होते. कॅम्पमधील दस्तुर हायस्कुल येथे दुपारीही मतदानासाठी रांगा होत्या.
मतदानासाठी रांगेत २५ ते ३० मतदार होते. यामुळे मतदानाला किमान अर्धा ते एक तास लागत होता. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ केंद्र आणि ७२ बुथ आहेत. यातील काही भाग कॅन्टोमेंट विधानसभा आणि हडपसर विधानसभा मतदार संघात येतो. दरम्यान, मागील दोन दिवस परिसरात कोणतीही अनुचीत घटना घडली नाही. तसेच येथे मतदान शांततेत झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दिली.





