वाईकरांचे लक्ष निकालाकडे! सकाळी १० वाजता उघडणार मतपेट्या; ‘असा’ आहे प्रशासनाचा प्लॅन

प्रभात वृत्तसेवा
वाई : वाई नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालासाठी प्रशासनाने सर्व पातळ्यांवर तयारी पूर्ण केली असून, मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचार्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून योग्य त्या सूचना केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मतमोजणीसाठी एकूण 11 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. 1 ते 10 मतदान केंद्रांवरील मतमोजणी प्रत्येकी तीन फेर्यांमध्ये करण्यात येणार असून 11 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतपत्रिकांची चार फेर्यांमध्ये मोजणी होणार आहे. प्रत्येक फेरीदरम्यान काटेकोर नियमांचे पालन करण्यात येणार असून, मतमोजणी प्रक्रियेवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लक्ष ठेवण्यात येणार आहे.
मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल फोन वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमभंग करणार्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
मतमोजणीच्या कामासाठी सुमारे 75 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मेटकरी यांनी दिली. मतमोजणीदरम्यान अचूकता व वेळेचे पालन व्हावे, यासाठी प्रत्येक टेबलवर जबाबदार कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
दरम्यान, मतमोजणी केंद्र परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाहेरून 67 होमगार्ड जवानांची नियुक्ती करण्यात आली असून, वाई पोलीस स्टेशनचे 30 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी परिसरावर सतत नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली.





